Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 97

'माझ्यासारखे ?'

'परंतु तुझ्याप्रमाणे चोर्‍या करणारा नव्हे.'

'प्रामाणिक श्रम करुनही पोट भरत नाही. चोरी करू नये तर काय करावे ?'

'तू केलेस का कधी श्रम ?'

'आई करी. परंतु घरात नेहमी ददात असे. जाऊ द्या मला.'

'मिरे, त्याला मी जाऊ दिले. ती अंगठी माझ्याजवळ परत आली. माझ्या आईने मरताना मला दिलेली ती अंगठी, माझ्या आईला माझ्या पित्याने दिलेली अंगठी. मी तुझ्या आईला दिलेली ती अंगठी ! त्या जंगलात ती अंगठी पुन्हा माझ्याजवळ आली. तू भेटशील अशी आशा वाटली. परंतु आशेचा अंकुर मी मनातून खुडून टाकला. जगच्चालकाची इच्छा नेहमी मानवी इच्छेच्या विरुध्द असते, असा माझा कटुतम अनुभव होता. म्हणून मी तुझ्या तपासात न येता पुन्हा जगभर भटकलो. सिंह पाहिले. हत्तींचे कळप पाहिले. उंच मानेचे जिराफ पाहिले. हिर्‍याच्या खाणी पाहिल्या. परंतु तुला भेटायला यावे असे मधून मधून मनात येतच असे.

एकदा लंकेच्या द्वीपकल्पात एका सुंदर बौध्द धर्माच्या विहारात मी झोपलो होतो आणि स्वप्नांत सुमित्रा आली. 'तुमची मी वर्षानुवर्षे वाट पाहात आहे.' असे ती म्हणाली. मी डोळे उघडले. मी पुन्हा झोपलो. पुन्हा आंधळी सुमित्रा स्वप्नात दिसली. 'शांताराम, का रे येत नाहीस ?' ती मला म्हणाली. शेवटी मी तुमचा तपास करीत आलो. त्या पहिल्या गावी परत आलो. मला कोणी ओळखले नाही. जगातील सार्‍या ठिकाणच्या हवापाण्याचा माझ्या चर्येवर परिणाम झाला होता. परंतु मी डॉक्टरांकडे गेलो. बोलता बोलता गोष्टी निघाल्या. ते नि तुम्ही हवाफेर करायला जाणार असे ऐकले. 'मी येऊ का बरोबर ?' असे त्यांना विचारले. त्यांनी आनंदाने संमती दिली. मी तुमच्याबरोबर आलो आणि तुम्हाला पाहिले. शांत, गंभीर सुमित्रा पाहिली आणि तू, माझी मिरी, तुला पाहून माझे पितृहृदय वात्सल्याने उचंबळले. माझे डोळे भरून आले. मी ते इथे कोणाला दाखवले नाहीत आणि त्या डोंगरावर मी निजलो होतो. झोपेत काही बडबडलो. हा कोणी दु:खी, निराश जीव आहे असे तुला वाटले. तुझ्या डोळयांतील अश्रू माझ्या मुखावर पडले. मी जागा झालो. मी नास्तिकासारखे बोलत होतो. तू श्रध्देचा धर्म मला देत होतीस. अंधारापलीकडचा प्रकाश दाखवीत होतीस. ढगापलीकडे असणारा सूर्य दाखवीत होतीस. तुझे बोल ऐकून माझे निराश हृदय फुलले. तुला जवळ घ्यावे असे वाटत होते. परंतु वेळ आली नव्हती. मी तुम्हांला सोडून पुढे गेलो. तुमच्यासाठी ठिकठिकाणी जागा घेऊन ठेवीस असे. तुमच्याबरोबर राहणे मला सहन होईना. सुमित्रा, माझी सुमित्रा ! अंध सुमित्रा ! तिच्या या दुर्दैवाला मी कारण. परंतु तिच्या मनात माझ्याविषयी सद्‍भाव आहे की नाही कोणास ठाऊक ? मी पैसे खाल्ले असे तिचेही मत आहे की काय ? मी तुमच्यापासून दूर राहत होतो.

परंतु तुला मी डोळयांआड करू इच्छित नव्हतो. त्या नंदनवनात तू तुझा मुरारी पाहिलास. त्या आगगाडीच्या रुळाजवळ तू उभी होतीस. मी तुला मागे ओढले. तुझी निराशी मी ओळखली.

मिरे, माझ्या बाळे, निराश नको होऊस. तो तुझा मुरारी तुला मिळेल. मी त्याला भेटलो. त्याचे तर तुझ्यावर प्रेम दिसते. काही तरी घोटाळा आहे असे वाटते. तुझा गैरसमज झालेला असावा. तुझा प्रेमचंद्र, तो संपूर्णपणे फुलेल.

मिरे, तूही माझा तिरस्कार करशील का ? मी माझी सारी कहाणी तुझ्यासमोर ठेवली आहे. आपल्या पित्याला प्रेमाने भेटावे असे वाटत असेल तर धावत ये. मी बाहेर तुमच्या बागेत उभा आहे. डॉक्टर पत्र देऊन जातील. मी बागेतील पुन्नागाच्या झाडाखाली उभा असेन. तू आली नाहीस तर तुलाही माझा तिटकारा वाटतो असे समजून मी निघून जाईन. तू सुखी अस. तुझा प्रियकरही तुला मिळो. तुझे जीवन कृतार्थ होवो. तुझी श्रध्दा न भंगो. तुझ्या बापाचा तुला तिरस्कार वाटला, तरी तुझ्या बापाचे आशीर्वाद तुला मिळत जातील. ज्याची प्रार्थना मी पुन्हा करू लागलो, त्याची तुझ्यासाठी प्रार्थना करीत जाईन. मिरे बाळ ! आशेने, अपार भावनांनी उचंबळून तुझा दुर्दैवी पिता तुझी वाट पाहात आहे.

तुझा पिता

शांताराम.'

मिरीच्या डोळयांतून अश्रूधारा गळत होत्या. पत्रातील 'माझ्या मुली, माझ्या कन्यके-' हे शब्द वाचूनच ती थरारली होती. जणू शरीराचा अणुरेणू कंपायमान झाला. किती तरी कोडी उलगडत होती. स्वत:च्या जीवनाची कथा तिला समजली. अभागी पिता ! तिने ते पत्र उशीखाली ठेवले. ती खाली आली. हळूच दार उघडून बागेत आली. आकाशात चंद्र शोभत होता. तिला पुन्नागाच्या झाडाखाली पित्याची मूर्ती दिसली. तिचा पिता ! होय ! मिरीचा पिता. ती धावली. पिता पुढे आला.

मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101