मिरी 80
'बाळ, तू चमत्कारीक बोलतेस. बोल, बोल. सांग मला सारे. मी आता वयातीत माणूस आहे. माझ्याजवळ सांगायला काही हरकत नाही. मी निरुपद्रवी आहे.'
'तुम्ही का कधीच सुखी नव्हता.'
'सुखाचा एखादा क्षण अनुभवला असेल. परंतु दु:खच सदैव नशिबी आहे.'
'परंतु सुख येईल.'
'कधी येईल ? आता आशा नाही. हे जग वाईट आहे. दु:खाने भरलेले आहे. येथे संशय फार. गैरसमज फार. किती तरी वर्षांत सुखाचा वारा मला शिवला नाही.' असे म्हणून त्याने पुढील चरण म्हटले.
“जगाच्या बंदिशाळेला
सुखाचा कोठला वारा”
'अशा दु:खी जीवांची मी कीव करीन. त्यांना सुख मिळावे म्हणून मी साहाय्य देईन. त्यांच्यासाठी प्रार्थना करीन.'
'मी आशेच्या पलीकडे गेलेला आहे.'
'परंतु प्रार्थनेच्या पलीकडे नाही ना गेलात ? प्रार्थनेच्या पलीकडे कोण जाणार ? निराशाही प्रार्थनेसमोर थबकते नि तिचे सुंदर आशेत परिवर्तन होते.'
'मुली, हे बघ दाट ढग येत आहेत. वादळ का येणार ? दाट काळेकुट्ट ढग. ते ढग ज्याप्रमाणे प्रकाशाला येऊ देत नाहीत, त्याप्रमाणे निराशा सुखाला येऊ देत नाही. आशेच्या किरणांना येऊ देत नाही.'
'परंतु ढग कितीही वेळ राहिले तरी चिरंजीव नाहीत. सात सात दिवस मुसळधार पाऊस पडतो. सूर्यदर्शन होत नाही. परंतु आठव्या दिवशी पुन्हा सूर्यनारायण दिसतो. प्रकाश सर्वत्र पसरतो. निराशा, दु:खे, क्लेश, विफलता यांच्या पलीकडे सुखाचा प्रकाश शेवटी आहे. तो पाहायला शिका.'
'परंतु ज्यांना हा दूरचा प्रकाश दिसत नाही. त्यांनी काय करावे ?'
'श्रध्देचे डोळे घ्यावे. श्रध्दा बरोबर घेऊन जीवनातून धडपडत जावे.'
'बाळ, श्रध्दा टिकत नाही. कोणा महात्म्याची श्रध्दा अनंत असेल. सामान्य माणसांची श्रध्दा पुन्हापुन्हा खंडित होते. श्रध्देचा धागा तुटतो.'
'तो धागा पुन्हा जोडावा नि धडपडत पुढे जावे. तो बघा प्रकाश आला. ढग गेले. उठा, बघा तो प्रकाश.'
तिने त्याला उठवले. प्रकाश दाखविला.
'मुली बोल. मला शिकव.'
'तुम्ही या जगाचा तिटकारा करता. होय ना ?'
'हो. तू नाही का करीत ?'
'नाही.'
'तू या जगावर कधी संतापली नाहीस ? जगावर कधी दातओठ खाल्ले नाहीस ? या जगाचा तुला कधी वीट नाही आला ? हे जग दुष्ट आहे, असे तुला कधी नाही वाटले ?'
'मीही पूर्वी असे कधी कधी करीत असे. हे जग वाईट आहे, दुष्ट आहे, असे म्हणत असे.'