मिरी 10
यशोदाबाई गेल्या, कृपाकाका मिरीजवळ प्रेमाने बसले. तिच्या केसांवरून ते हात फिरवीत होते. खाली वाकून त्यांनी तिचा एक प्रेमभराने पापा घेतला आणि मिरीने डोळे उघडले, तिने दोन्ही हातांनी कृपाकाकांचे तोंड धरून ठेवले.
'कुठे गेले होतात मला सोडून ? आता जाऊ नका हं. नाही तर असे धरून ठेवीन. पकडून ठेवीन.'
'यशोदाबाई होत्या ना जवळ ?'
'हो, त्यांनी लापशी दिली. आणि मला त्या पेटी शिवीत होत्या, छानदार कापडाची.'
'ही बघ पेटी, घाल बरे अंगात. ऊठ हळूच.'
मिरी उठली, कृपाकाकांनी तिला पेटी घातली.
'छान झाली. आता थंडीची बंडी होईल.'
'मिरे, संध्याकाळी जावे लागले बाहेर. दिवे लावायला नको का जायला ? गेले पाहिजे.'
'तुम्ही किती दिवस असे काम करणार ? तुमचे पाय दमत नाहीत ? मी मोठी झाले म्हणजे मी करीन तुमचे काम. घेईन खांद्यावर शिडी आणि सारे दिवे लावीन. लोकांना अंधारात रस्ता दिसेल. नाही कृपाकाका ?'
'तू फार बोलू नकोस.'
'पुन्हा यशोदाबाई माझ्याजवळ बसतील ?'
'त्यांचा मुरारी बसेल.'
'मुरारी चांगला आहे का ?'
'त्याच्याहून चांगला मुलगा मी पाहिला नाही.'
'मिरी कशी आहे ?'
'गोड आहे. आता पडून राहा. अजून अंगात ताप आहे. वारा लागता कामा नये. पांघरुण असू दे अंगावर.'
मिरी पडून राहिली. पुन्हा तिला शांत झोप लागली. सायंकाळी शिडी खांद्यावर घेऊन हातात कंदील घेऊन कृपाकाका आपल्या कामाला गेले. आणि मुरारी मिरीजवळ बसला होता. त्याने तेथे दिवा लावला. एक उदबत्ती त्याने तेथे ठेवली लावून. तो तेथे प्रार्थना म्हणत होता. गोड अभंग म्हणत होता आणि शेवटी म्हणाला, 'देवा, मिरीचा ताप निघू दे. कृपाकाकांना आनंद होऊ दे. त्यांच्या श्रमांना, प्रयत्नांना यश दे.'