मिरी 22
'आपण मनात सर्वांचे भले चिंतणे म्हणजेच देवाचे राज्य. आपण सारी देवाची लेकरे. देवाचे सर्वांवर प्रेम आहे. म्हणूनच आपणही सर्वांवर प्रेम करावे.'
'त्या दुष्ट आत्याबाईवरसुध्दा ?'
'हो, तिच्यावरसुध्दा.'
'तुम्ही कराल का, यशोदाआई ?'
'मिरे, हे कठीण आहे. पण प्रयत्न करावा. अधिक चांगले होण्याचा आपण प्रयत्न करीत राहिले पाहिजे. जा, आता कृपाकाका येतील. शेगडी पेटव. आज भाजी कसली करशील ?'
'मुळयाची करीन. मला येईल करायला.'
मिरी खोलीत गेली. तिने पुन्हा एकदा खोलीचा केर काढला. तिने भाजी चिरली. चूल पेटवून तिने तीवर भाजी शिजत ठेवून दिली आणि नळावर गेली. कपडे धुऊन, अंग धुऊन ती आली. केस नीट विंचरून तिने केसात फुले घातली. मग ध्रुवनारायणांच्या तसबिरीला तिने हार घातला आणि हात जोडून ती म्हणाली, 'देवा, तू कुठे रे असतोस ?असशील तेथे मिरीचा नमस्कार घे.'
ती पाटी घेऊन लिहित बसली. सुमित्राने तिच्यासाठी सचित्र पुस्तक पाठविले होते. पुस्तकही ती वाचीत बसली. पुन्हा लिही. कृपाराम, मुरारी असे शब्द लिहिले. तिने स्वत:चे नाव लिहिले-मिरी. नंतर पुन्हा तिने सारे पुसून टाकले. ती निराळे लिहू लागली.
'कृपाकाका मला फार आवडतात. मुरारी मला आवडतो. माझे मोठे डोळे मुरारीला आवडतात. यशोदाआईंना मी आवडते. माझ्या केसात फुले घातली आहेत. एक फूल मुरारीला देईन. एक कृपाकाकांना. कृपाकाका मग माझा मुका घेतील नि हसतील. मी पण हसेन. मुरारी हसेल. सारी हसू, सारी नाचू, सारी खेळू.'
ती उठली. भाजी झाली होती. तिने भाकरी केली आणि कृपाकाका आत आले.
'आज फुले कोठली, मिरे ?'
'सुमित्राताईंकडची. त्यांनीच माझ्या पेटीसाठी कापड पाठविले; होय ना बाबा ?'
'तुझी त्यांची ओळख झाली वाटते.'
'हो; त्यांच्या घरीसुध्दा गेले होते. खाऊ खाल्ला. फुले तोडून आणली. ही बघा केसात.'
'छान दिसतात तुला.'
'आणि हे तुम्हांला फूल.'
'हे दुसरे कोणाला ?'
'मुरारीला, तुम्ही आता अंघोळ करा. आपण लवकर जेवू. मग मी लिहीत-वाचीत बसेन. हे बघा पाटीवर लिहिले आहे.'
'बघू !'