मिरी 17
खरेच ते आले. वर खोलीत येऊन ते खाटेवर बसले. त्यांनी सर्वत्र पाहिले. आज सारे नीटनेटके होते.
'मुरारी, चल की जेवायला.' यशोदाआईंनी हाक मारली.
तो गेला. मिरी कृपाकाकांजवळ बसली. त्यांनी प्रेमाने तिला जवळ घेतले. त्यांनी तिचा मुका घेतला.
'तू स्वयंपाक केलास वाटते ? तू नुकतीच तापातून उठलीस. कशाला हे काम ?'
'मला आता बरे वाटते. आज माझ्या हातचे जेवा. रोजच मी करीन. मला सारे करायला येईल, भाकरीसुध्दा भाजीन. चांदकी करीन.'
'खोली आज कशी छान दिसते.'
'जमनी आली होती आणि मुरारीने हे चित्र दिले. तो तुमचे चित्र काढणार आहे.'
'आपले चित्र कशाला ? देवाचे चित्र पुरे.'
'हे टमाटे गोटीरामाने पाठविले.
'एक मुरारीला दे. जा.'
ती धावतच गेली, मुरारी व त्याचे आजोबा भाकरी खायला बसले होते.
'मुरारी, हा एक टमाटो तुम्हांला कापून देऊ का ?'
'दे कापून. तो बघ चाकू.'
तिने कापून त्यांना वाढला. एक फोड यशोदाआईस ठेवून ती पळत गेली. ती दोघेही जेवायला बसली. कृपाकाका बेसनाची स्तुती करीत होते. जेवणे झाली.
'मिरे, नीज आता. दमलीस.'
'मी निजते. तुम्ही बसा जवळ. थोपटा.'
मिरी निजली. कृपाकाका तिला थोपटीत होते. अभंग म्हणत होते. मिरीला झोप लागली. कृपाकाकांनी देवाला प्रार्थून म्हटले,
'गोड गुणांची मुलगी. तिला सुखी ठेव. मी किती दिवस पुरणार ? प्रभो, तूच तिला सदैव सांभाळ.'