मिरी 39
डॉक्टर तपासून गेले. मिरी आनंदली. ती सुमित्राताईंजवळ बसली. तिने त्यांचे अंथरूण स्वच्छ केले. फुलांचा गुच्छ आणून ठेवला. ती प्रेमाने त्यांचे पाय चेपीत बसली.
'मिरे, गाणे म्हण एखादे.'
'कोणते म्हणू ?'
'म्हण एखादा अभंग.'
पाय चेपता चेपता मिरीने एक गोडसा अभंग म्हटला
“माझे जीवन तुझे पाय
कृपाळू तू माझी माय
नेदी दिसो केविलवाणे
पांडुरंगा तुझे तान्हे
जन्म-मरण तुझ्यासाठी
आणिक नेणो दुज्या गोष्टी
तुका म्हणे दया
देवा कर अभागिया”
क्षणभर दोघी स्तब्ध होत्या. आणि पाय अधिकच घट्ट धरून, उचंबळून मिरी म्हणाली, 'खरेच हे पाय म्हणजे माझे जीवन आहे, खरेच.'
सुमित्राताई कांही बोलल्या नाहीत.