मिरी 23
कृपाकाकांनी ते वाचले. त्यांनी तिला शाबासकी दिली. इतक्यात मुरारीही आला.
'आज मिरीची ऐट आहे अगदी. केसांत फुले आणि कानांत नकोत का ?'
'आणि नाकात नकोत का ? तू थट्टाच करतोस !'
'आणि हे पाटीवर काय ? तुझे डोळे मला आवडतात म्हणून कोणी सांगितले ? आणि आईला का तू आवडतेस ? पाटीवर काही तरी लिहावे वाटते ?'
'मिरी कोणाला आवडत नाही, असे उद्या लिहीन. तू जा. तुला फूल ठेवले आहे ते देतच नाही. जा तू.'
'तुझ्या केसातील काढून पळवीन.'
'काढ तर खरे. मी मारीन.'
'मी तुला मारीन. फिटंफाट होईल.'
'तू जा मुरारी.'
'अग मिरे, असे काय करतेस ? बसू दे त्याला. मुरारी चांगला आहे. तुला तो शिकवतो. चित्रे देतो.'
'आणि माझ्याशी भांडतो. रडवतो मला.'
'आणि हसवीत नाही वाटते ? सारे सांग की.'
कृपाकाका नि मिरी जेवायला बसली.
'मुरारी, भाजी खातोस ?'
'मी भांडतो ना ? मग कशाला विचारतेस ? नको मला भाजी. नको फूल. तुझे काही नको.'
'मी यशोदाबाईंना नेऊन देते. त्या तुला वाढतील. झक्कत खाशील.'
'मी जातोच घरी.'
'मुरारी, मुरारी हे फूल ने.'
'कुठे आहे ? दे लवकर.'
'नाही देत जा. एवढा ऐटीने निघाला होतास तर परत कशाला आलास ? माझे फूल मागायला आला भिकारी.'
मुरारी गेला. रागावून गेला. दोन दिवसांत मग तो मिरीकडे पुन्हा आला नाही. मिरी रडकुंडीस आली. कृपाकाका कंदील लावायला गेले. मिरी खिडकीत बसली होती. इतक्यात हळूच येऊन कोणी तरी तिचे डोळे धरले.