मिरी 16
'हुशार आहेस तू.'
'यशोदाआई गेल्या. मिरी आनंदली होती. आज तिने सारे केले. होते. खोली सुंदर व्यवस्थित होती. ते चित्र तेथे होते. व्यवस्थित अंथरुणे. स्वयंपाक तयार. आपल्याला सारे येईल असे तिला वाटले. अभिमानाने ती तेथे बसली होती. तिने खिडकीतून पाहिले. आकाशात तो ठळक तारा ती पहात होती. परंतु तिला तो आज कोठे दिसेना. इतक्यात मुरारी आला.
'मिरे, मंडईतील गोटीरामने कृपाकाकांना दोन टमाटो दिले आहेत. ठेव. त्यांना आवडतात.'
'गोटीरामने दिले ?'
'कृपाकाकांचे सर्वत्र मित्र आहेत. टांगेवाले मित्र, भाजीवाले मित्र, ते खरे कृपाकाका आहेत. आज तू केलेस हे सारे. होय ना मिरे ?'
'हो.'
'आता पुढे लिहायवाचायलाही शीक. तेसुध्दा यायला हवे.'
'तू धडे दे पहिले.'
'देईन अक्षरे काढून. तू पटापटा शिकशील.'
'कशावरुन रे ?'
'तुझे डोळे मोठे आहेत म्हणून. मोठया डोळयांत अक्षरे पटकन शिरतील.'
'तुला आवडतात माझे डोळे ?'
'हो, फार आवडतात, गाईचे डोळे असे असतात.'
'थट्टा करतोस तू, माझे डोळे म्हणजे म्हशीचे, गाईचे, बैलाचे होय ना ?'
'गाई-बैलांचे डोळे सुंदर नसतात ? काळेनिळे ते डोळे मला आवडतात. जणू खोल डोह असे ते वाटतात. तुला कोणाचे आवडतात डोळे ? हत्तीच्या डोळयांसारखे म्हणू ?'
'हत्तीचे तर अगदी बारीक.'
'तू कधी पाहिलेस ?'
'सर्कस आली होती. तिच्या जाहिराती वाटताना बरोबर हत्ती नसे का ? एवढा मोठा हत्ती, परंतु डोळे अगदी बारीक.'
'मग हरिणाच्या डोळयांसारखे म्हणू ?'
'मी हरीण नाही पाहिले. चपळ असते; नाही रे ? त्याचे डोळे असतात का पण सुंदर ? अरे ! शिडी वाजली. कृपाकाका आले.' ती एकदम टाळी वाजवून म्हणाली.