मिरी 77
'जाऊ' सुमित्राताई म्हणाल्या.
लडी, मडी, राणीसाहेब चहा घेऊन आल्या.
'मिरे, काही खायला आण. डॉक्टर आले आहेत.' कृष्णचंद्र म्हणाले.
मिरी त्वरीत गेली. चिवडा, शंकरपाळे मोठया कागदात घेऊन आली. टेबलावर तिने तो कागद ठेवला. सारी मंडळी फराळ करू लागली. मिरी पटकन् उठली. तिने कपातून चहा ओतला. चहा जरा लालसर दिसत होता.
'पूड बरीच घातलेली दिसते. कडक चहा आहे.' कृष्णचंद्र म्हणाले.
'मला तर सौम्य आवडतो.' डॉक्टर म्हणाले.
'तुम्हा लोकांना चहाबाज कोण म्हणेल ? खरी लज्जतच तुम्हांला नाही. कमीत कमी दूध नि जास्तीत जास्त पूड आणि साखर नावाला, तो खरा चहा.' लडी म्हणाली.
'चहा सुंदर झाला आहे.' मडी म्हणाली.
'चहा सुंदर झाला आहे.' राणीसरकार म्हणाल्या.
'अगदी रद्दी झाला आहे.' कृष्णचंद्र म्हणाले.
'माझ्या उलट बोलायची तुम्हांला सवयच आहे.'
'पतीपत्नीचा तो तर विनोद. विशेषत: अशा उतार वयातील पतीपत्नींचा.' डॉक्टर हसून म्हणाले.
'मी का म्हातारा दिसतो ?' कृष्णचंद्रांनी विचारले.
'आणि माझा एक तरी केस पांढरा झाला आहे का ? मला तर मी अगदी तरुण आहे असे वाटते.' राणीसरकार म्हणाल्या.
'कृष्णचंद्र मी जातो. मग काय ठरले ? येणार का मिरी आणि सुमित्राताई ?' डॉक्टरांनी विचारले.
'सुमित्रा, तुझे काय म्हणणे ? '
'जाईन डॉक्टरांबरोबर. येईन चार दिवस हिंडून.'
'ठीक तर, तयारी करा. कधी निघायचे डॉक्टर ?'
'निघू दोनचार दिवसांतच.' असे म्हणून डॉक्टर निघून गेले. कृष्णचंद्र दरवाजापर्यंत पोचवायला गेले नी परत आले. ते खुर्चीवर बसले.
'मडी, वाचून दाखवतेस ना ?' त्यांनी विचारले.
'मी वाचू की लडी वाचणार ?' तिने विचारले.
'कोणीही वाचा. ती मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रे तेथे पडली आहेत उचला.'
मडी वाचू लागली. ती शंभरदा अडे. अं-अं करी. मध्येच डोळे चोळी. चारचारदा केसांच्या बटा मागे मागे सारी.
'रेमीडोकीच दिसतेस. वाच की जरा घडाघडा. स्वत:ला वाचलेले समजते आहे अशा आवाजात वाच. मिरी सुंदर वाचते. तिचे वाचणे म्हणजे जणू संगीत. लडी, तुझा प्रयोग होऊ दे.'
लडीने एक मासिक वाचायला घेतले. इंग्रजी होते ते.
'कोणता लेख वाचू ?' तिने विचारले.
'तुला आवडेल तो.' कृष्णचंद्र म्हणाले.
लडी त्यातील एक कविता वाचू लागली.
'अगं, ती कविता आहे. गद्यासारखे काय वाचतेस ? अरसिकच आहेस. तुमचे सारे काव्य कपडयालत्त्यांत. त्या कवीची भावना काही समजते का ? पुरे, ठेवा खाली. जा, पत्ते कुटीत बसा. मिरे, तू दाखव ग त्यांना तुझे कौशल्य.'