मिरी 3
'काय मिरे, आज दूध सांडलेस ना ?' एकाने विचारले.
'आत्याबाईने मारले की नाही ?' दुसर्याने प्रश्न केला.
'आत्याबाई मारते; परंतु खायलाही देते. कोण घालील खायला दुसरे ? आई ना बाप. मी म्हणून तिला पोसते.' आत्याबाई गरजली.
मिरी काहीच बोलली नाही. ती काम करीत होती. चटणी वगैरे वाढीत होती. पाणी देत होती. मध्येच आत्याबाई चकरा घालीतच होत्या. सारे जेवून गेले. मिरीचेही आता पान वाढण्यात आले. दोन घास खाऊन ती उठली. ती वर गेली. त्या खिडकीजवळ आपले अंथरूण घालून ती बसली. रस्त्यातील त्या कंदिलाकडे ती पाहात होती. आकाशातील तेजस्वी तार्यांकडे ती पाहात होती. एक तारा तिला फार आवडे. शेवटी ती झोपली.
दुसरा दिवस उजाडला. संध्याकाळ केव्हा होईल, याची ती वाटत पाहात होती. तो दिवे लावणारा तिला काही तरी जम्मत आणून देणार होता. मिरी तर्क करीत होती. 'काय बरे तो आणील ? खाऊ आणील का ? का एखादे खेळणे ? का चित्रांचे पुस्तक ? परंतु वाचता कुठे येत आहे मला ? काय बरे तो आणील ? कृपाराम. केवढे नाव ! का मला ते नवीन पोलके आणतील, का सुंदर चपला आणतील ते ? काय बरे असेल ती जंमत ?' ती विचार करीत होती.
दिवस गेला. आज मिरी लवकर दूध आणायला गेली. तिने दूध आणून ठेवले. आणि ती पुन्हा रस्त्यावर येऊन त्या दिव्याच्या खांबाजवळ येऊन उभी राहिली. केव्हा येणार तो शिडीवाला, तो दिवे लावणारा ? अरे ! आला. तो पहा. तो पलीकडचा दिवा त्याने लावला. आता तो सरळ येथेच येणार. मिरीने टाळी वाजवली.
'गंमत आणलीत का ?' तिने विचारले.
'दिवा लावून मग देतो हं.' तो म्हणाला.
कृपारामाने खांबाला शिडी लावली. तो वर चढला. मिरी सारे उत्सुकतेने बघत होती. दिवा लावला गेला. मिरीने नमस्कार केला. कृपाराम खाली उतरला.
'मिरे, नमस्कार केलास?'
'दिवा देखून नमस्कार, असे नाही का म्हणत ?'