मिरी 65
'मिरीचे नशीब चांगले आहे.' रमाकांत म्हणाला.
'तिचा प्रियकर यायचा आहे. लवकर लग्न व्हायचे आहे.' मडी म्हणाली.
'आणि प्रेमाचे नशीब ?' लडी म्हणाली.
'तिलाही कोणी तरी मिळेल.' राणीसरकार म्हणाल्या.
'पुरे आता खेळ.' मिरी म्हणाली.
'आपण फिरायला जाऊ.' प्रेमा म्हणाली.
'चला.' लडी म्हणाली.
'परंतु बरोबर कोणीतरी हवे. मिरे, येतेस ?' मडीने विचारले.
'जा ग मिरे त्यांच्याबरोबर. त्या डोंगरावरुन सुंदर देखावा दिसतो. जा तिकडे यांना घेऊन.' राणीसरकार म्हणाल्या.
'परंतु वाटेत जरा दलदल आहे. जपून जायला हवे.' मिरी म्हणाली.
'आम्ही जपून जाऊ.' लडी, मडी म्हणाल्या.
'मीही तुमच्याबरोबर येतो. चिखलात गाई रुतल्या तर काढायला गोपाळ हवाच.'
'वा रमाकांत ! कवी दिसता !' लडी म्हणाली.
'म्हणजे वेडे ना ?' मडी म्हणाली.
'जगात सारे वेडेच आहेत. प्रत्येकाला कशाचे तरी वेड असते.' रमाकांत म्हणाला.
'आता कवीचा तत्वज्ञानी झाला बरे !' प्रेमा म्हणाली.
'परंतु मिराबेन काही बोलत नाहीत !' तो म्हणाला.
'त्या धीरगंभीर असतात.' राणीसरकार तिरस्काराने बोलल्या.
'अकाली धीरगंभीरत्व शोभत नाही. ते हास्यास्पद होते. खरे की नाही मंडळी ?'
'एकदम खरे.' मडी, लडी, उद्गारल्या.
सारी फिरायला गेली. प्रेमा व मिरी दोघींची जोडी झाली. लडी नि मडी दोघींची जोडी जोराने आघाडीला चालली. रमाकांताला कोणाबरोबर जावे समजेना. तो मध्येच लोंबकळत होता. क्षणभर या जोडीबरोबर चाले, क्षणभर भराभरा जाऊन पुढील जोडीशी बोलू लागे. परंतु त्याचे डोळे मिरीकडे असत. मिरी त्याची दृष्टी चुकवीत असे.
आता ती दलदल जवळ आली.
'थांबा, मी येते.' मिरीने ओरडून सांगितले.
'चला, आपण जाऊ. आपल्याला का डोळे नाहीत ?' लडी म्हणाली.
आणि लडी, मडी, रमाकांत चालली पुढे. तो रमाकांत एकदम चिखलात फसला. लडी नि मडी थोडक्यात वाचल्या. परंतु त्यांच्या अंगावर चिखल उडालाच. आता रमाकांताला बाहेर कसे काढायचे ?