*समारोप 4
“सरले, सारे सारे आठवते. चल आता उशीर होईल. आज बाळ आहे बरोबर. त्या वेळेस बंधन नसे. बाळ म्हणजे प्रेमळ बंधन. होय ना रे लबाडा? ती बाभळीची पिवळी फुले घालू का तुझ्या कानांत?”
“प्रकाशला हे डूल किती छान दिसतात ! बाबांनी त्याचे सारे केले. किती प्रेमळ झाले आहेत बाबा !”
“जसा पिकलेला रसाळ आंबा !”
तिघे घरी आली. रात्री गच्चीत बसली. प्रकाश झोपला. विश्वासरावांनी रमाबाईंच्या बाळाच्या मरणाची करूणगंभीर कथा सांगितली. आणि मग सारी स्तब्ध होती.
“बाबा, हे घर आपण विकून टाकू. या घरात सार्या शोकस्मृती आहेत. आणि आपण ठाणे जिल्हयात जाऊ. आश्रमात राहू. त्या आदिवासी सेवा मंडळात राहू. उदय नि मी सेवेला वाहून घेणार आहोत. तुम्ही आमच्याजवळच राहा. आता एकटे दूर नका राहू हो बाबा. आपण एकत्र राहू. होईल ती गरिबांची सेवा करू. जीवने कृतार्थ करू.”
“तुम्ही म्हणाल ते योग्यच असेल.”
एके दिवशी सरला नि उदय बाळाला घेऊन मुंबईस आली. त्यांनी आधी पत्र पाठविलेच होते. शेटजींना खूप आनंद झाला.
“ही माझी धर्मकन्या सरला, हा तिचा पती, हा त्यांचा बाळ.” अशी त्यांनी स्वत:च्या पत्नीला ओळख करून दिली. त्यांनी त्या सर्वांना वस्त्रे, भूषणे दिली. बाळाला बाळलेणे दिले. आणि आदिवासी सेवा संघाचे कार्यकर्ते आले होते, उदयची नि त्यांची ओळख करून देण्यात आली. त्यांना अत्यंत आनंद झाला.
“तुम्ही आल्याने फार चांगले होईल. सरलाताईचाही फार उपयोग होईल. स्त्रियांत त्या जातील. तुम्ही येणार असे शेटजी म्हणाले होते. आम्ही वाटच पाहात होतो. एका सुंदर ठिकाणी सेवाश्रम आहे. तेथून कार्यकर्ते सर्वत्र कामासाठी जातात. तुम्ही या. तुम्हाला सुंदर झोपडी बांधून देऊ. सरलाताई शाळा चालवतील. आनंद होईल.” सारे ठरले. उदय-सरला पुन्हा पुण्यास आली. बंगला विकण्याची जाहिरात देण्यात आली. आणि चांगले गि-हाईक भेटले. बंगला विकला गेला. तिकडे नाशिकचा सत्याग्रह स्थगित करण्यात आला होता. अणि सरला, उदय, विश्वासराव बाळासह एके दिवशी पुणे सोडून मुंबईस निघून आली. शेटजींकडे दोन दिवस राहिली.
“सरले, हे तुझे माहेर. समजलीस ना? लागेल ते मागत जा. तुझा बाळ मोठा झाला म्हणजे इकडे शिकायला पाठव. पुढे नव्या बाळंतपणासाठी इकडेच ये. लाजायला काय झाले? ऐकलेत का उदय? सरलेला पाठवीत जा हो.” शेटजींची प्रेमळ पत्नी म्हणाली.