गब्बूशेट 2
“तुमचा विनय तुम्हांला साजून दिसतो. बरे. जयगोपाळ.”
“जयगोपाळ.”
मोरशास्त्री गेले. गब्बूशेट दिवाणखान्यातच बसून होते. थोडया वेळाने ते मोटारीत बसून बाहेर गेले. त्यांना किती उद्योग ! पैसा का फुकट मिळतो? किती घालमेली कराव्या लागतात ! त्या सर्व उठाठेवी ते व्यापारीच जाणोत.
आज गब्बूशेट नाशिकला जाणार होते. नाशिकला त्यांनी नवीन बंगला बांधला होता. तेथे माळी असे. बंगल्याभोवती सुंदर बाग होती. शहराचा कंटाळा आला म्हणजे ते येथे येत. विश्रांती घेत. बरोबर आचारी वगैरे सारे घेऊन यायचे. नाशिकला दोन-चार दिवस राहून परत यायचे. नाशिक म्हणजे त्यांची करमणूक होती. त्यांचा आनंद होता. रामरायाचे दर्शन म्हणजे त्यांना अमोल वस्तू वाटे.
शेटजी येणार म्हणून बंगल्यात फोन आला होता. माळी झाडलोट करीत होता. त्याने सुंदर हार करून ठेवला. गुच्छ तयार करून ठेवला. दिवाणखान्यात त्याने पुष्पगुच्छ ठेवले. दारावर त्याने फुलांचे तोरण बांधले. आज मालक येणार होता. रामरायांच्या पूजेसाठी सुंदर पुष्पमाळा माळयाने करून ठेवल्या. शेवंतीच्या फुलांचे घवघवीत हार ! किती रमणीय दिसत होते ते !
मोटार आली. फाटक उघडले गेले. शेटजी उतरले, सामान उतरण्यात आले. शेटजी दिवाणखान्यात बसले. प्रवासाने ते थकले होते. जरा शीण आला होता. माळयाने फळे आणली. पोपयीच्या रसाळ फोडी. संत्री-मोसंब्यांच्या फोडी. डाळिंबाचे दाणे. शेटजींनी फलाहार केला. ते बागेत जरा हिंडले.
आणि मोटार कोठे चालली? कोणाला आणण्यासाठी चालली? मोटार रामभटजींकडे गेली. रामभटजी रामाची पूजा करून नुकतेच घरी आले होते. मोटार दारात थांबताच ते बाहेर आले.
“कोण आहे?”
“गब्बूशेट आले आहेत.”
“वा: ! छान. मी आलोच हा. आता जेवणखाण मागून.”
रामभटजींनी पोशाख केला. मोटारीत बसून ते निघाले. बंगल्यात आले. आत गेले.
“या रामभटजी, बसा.”