सनातनींची सभा 10
अध्यक्ष आले. सारे पाहू लागले. कोणी उठू लागले. स्वयंसेवक त्यांना बसा बसा म्हणत होते. बँडच्या तालावर सनातनी पुढारी आले. मंडपात कोणी म्हणाले, “हा बँड कशाला ! चौघडा का मेला? सनई का मेली?” कोणी उत्तर दिले, “अहो काळाचा महिमा आहे. बँड असला म्हणून काय बिघडले? आपल्या स्वयंसेवकांचाच आहे तो.” मंडपात अध्यक्ष शिरले. सारी सभा उभी राहिली. “सनातन धर्म की जय” असे जयघोष झाले. टाळयांचा कडकडाट झाला. मंडपात लावलेले विद्युत-पंखे सुरू झाले. ब्रम्हवृन्दास आनंद झाला. तरीही कोणी आपल्या उपरण्याच्या फलकार्यानेच खास स्वदेशी व सनातनी वारा घेत होते. विजेचा वारा कशाला? कोणी ताडपत्री पंखे आणले होते. कोणाजवळ बांबूची विझणे होती. परंतु गर्दीत वारा घेता येईना.
“अहो, त्या विजेच्या पंख्यांचा वारा येत असताना हे पंखे कशाला नाचवता?”
“आम्हाला तो वारा नाही खपत. वारा विंझण्याने घ्यावा असे श्रुतिवचन आहे.”
तेथे जरा गडबड होऊ लागली. स्वयंसेवक धावून आले. त्यांनी सारे शांत केले आणि नाकात तपकिरी कोंबल्या जात होत्या. शिंकांचा रोग फारच फैलावत होता. ध्वनिक्षेपकावरून स्वयंसेवक-सेनापतीने सांगितले, “आता तपकिरी बंद ठेवा. परिषदेच्या कार्यास लवकरच सुरूवात होईल.” परंतु तिकडे महिलामंडळींत गोंगाट सुरू झाला. कोणाची मुले रडू लागली. सारा गोंधळ !
“मुले घेऊन कशाला येतात येथे?” एक सनातनी म्हणाले.
“अहो, घरी कोण सांभाळणार?” दुसरे म्हणाले.
“स्त्रियांनी सभेत येऊच नये.” तिसरे म्हणाले.
“अहो, कथा-पुराणांना नाही का येत? ही सभा म्हणजे धर्माची आहे. काँग्रेसच्या सभेस जाऊ नये. परंतु येथे स्त्रियांनीही आलेच पाहिजे. सर्व प्रकारच्या धर्मकर्मात स्त्रियांचा सहकार हवा.” चौथे म्हणाले.
परंतु तिकडे स्वागत-गीत सुरू झाले. कार्याला एकदाचा आरंभ झाला. नंतर सनातन धर्माची महती गाणारे एक गीत झाले. आणि मग स्वागताध्यक्ष भाषणार्थ उभे राहिले. परंतु ती तिकडे कसली गडबड? सर्वांचे डोळे तिकडे लागले. कोण आहे तेथे उभे? अरे, ही तर सरला. तो शेला अंगावर घेऊन ती तेथे आली आहे. स्वयंसेवक तिला येऊ देत नाहीत. अध्यक्षांची मला परवानगी आहे, असे ती सांगत आहे.
“अरे या धर्मपरिषदेत ही कशाला?”
“माहीत आहे का कोण ती?”
“कधी कधी त्या खिडकीत दिसत असे. परंतु तिची दृष्टी खाली असे. विनयशील वेश्या.”
“हाकला तिला येथून. येथे का बाजार आहे?”
गडबड थांबेना. अध्यक्षांनी काय आहे असे विचारले. त्यांना सारे सांगण्यात आले.