भेट 2
“परंतु उदय आला तर?”
“तुम्ही दोघे राहा.”
“शेटजी, कोठे तरी सेवा करावी असे वाटते.”
“तिकडे ठाणे जिल्हयात एक सुंदर संस्था निघाली आहे. आदिवासी-सेवा-संघ. ठाणे जिल्हयात कातकरी वगैरे लोक आहेत. वारली लोक आहेत. वास्तविक तेच मूळचे तेथले राहणारे. परंतु आज ते केवळ गुलाम आहेत. ठिकठिकाणी जमीनदार आहेत. पारशी जमीनदार, ब्राह्मण जमीनदार, गुजराथी जमीनदार. या गरिबांची दशा फार वाईट आहे. त्यांना थोडे पैसे कर्जाऊ देतात. आणि त्यांचे व्याज कधीच फिटत नाही. जंगलातले गवत कापणे, लाकडे तोडणे, कोळसे तयार करणे, सारी कष्टाची कामे ते करतात. परंतु पोटभर खायला नाही. अंगावर नीट वस्त्र नाही. त्यांनी जरा हालचाल केली तर त्यांना धमक्या देतात. मेले तरी त्यांची दादफिर्याद कोणी घेत नाही. अन्याय, जुलूम, दारिद्रय कोण दूर करणार? मागे ३० साली सत्याग्रह चळवळ झाली, तर ठाणे जिल्हयातील पारशी वगैरे जमीनदार म्हणायचे, “आम्ही चळवळीस पैसा देतो. परंतु त्या वारली वगैरे लोकांत नका प्रचार करू. त्यांच्यात नका जाऊ. ते केवळ रानटी आहेत.” त्या गरिबांत विचार जाऊ नयेत म्हणून भांडवलवाले, जमीनदार, सावकार सारे खटपट करीत असतात. परंतु या श्रमणार्यांची संघटना केली पाहिजे. त्यांच्यात गेले पाहिजे. सेवेच्या साधनाने गेले पाहिजे. त्यांना उद्योग दिला पाहिजे. खादीचा, किंवा दुसरा कसला तरी. त्यांना स्वावलंबी केले पाहिजे. साक्षर केले पाहिजे. निर्भय केले पाहिजे. यापुढे माणसांसारखे जगायला त्यांनी उभे राहिले पाहिजे. परंतु सेवक हवेत. हुशार, त्यागी कार्यकर्ते हवेत. मागे ती संस्था पाहायला मी गेलो होतो. परंतु अद्याप बाल्यावस्थेत ती आहे. दहा-वीस निष्ठेची माणसे मिळाली तर काम होईल. तुझा उदय आला तर तू त्याला घेऊन त्या संस्थेत जा. मिशनरीप्रमाणे सेवा करा. मी आर्थिक मदत करीन. आता अशा सेवेच्या कामाला मदत देणे हाच धर्म. तुझ्या रामाच्या शेल्याने मला हे शिकविले.”
“रामाचा शेला काय काय तरी शिकवील. भिकारी जिणे श्रीमंत करील. रडके जिणे हसवील. जीवनाच्या चिंध्यांना भरजरी पीतांबराची शोभा देईल. नाही का? उदय आला तर खरेच आम्ही असे सेवक होऊ. परंतु भेटेल का उदय? येईल का? आणि शेटजी, हे सेवकराम कोण आहेत? स्वामी सेवकराम-तुम्ही पाहिले आहे त्यांना?”
“मी त्यांना पाहिले नाही. नावही ऐकले नव्हते. कदाचित आर्यसमाजी असतील. उत्तरेकडचे आर्यसमाज खूप सेवा करीत आहेत. अस्पृश्यता ते मानीत नाहीत. हुतात्मा श्रध्दानंत अस्पृश्यांसाठी वर्तमानपत्र चालवीत. हे स्वामी सेवकराम असेच कोणी असतील. येथील सत्याग्रहासाठी आले असतील.”