आशा-निराशा 17
“मी जाते.”
सरला टांग्यात जाऊन बसली. केव्हा एकदा पुण्यास जाईन असे तिला झाले आहे. तो आता नक्की भेटणार. तिला आशा आली. ती आता वाटेत जळगाव वगैरे कोठेही उतरली नाही. सरळ पुण्याकडे निघाली. पुणे स्टेशन जवळ येत होते. परंतु उतरल्यावर कोठे जायचे? उदय कोठे असेल? त्या खोलीवर असेल का? त्या खोलीवरच प्रथम जाऊ असे तिने ठरवले. पुणे आले. तिने टांगा केला. ती त्या खोलीवर आली. तो विद्यार्थी खोलीत नव्हता. तेथे भैय्या होता.
“भैय्या, ते उदय येथे आले होते का?”
“आले होते, येथे सामान ठेवून गेले. पुन्हा आले व सामान घेऊन गेले.”
“किती दिवस झाले?”
“महिना झाला असेल.”
“कोठे गेले?”
“तुमच्या घरी गेले असतील. दुसरीकडे कोठे जाणार?”
सरलेला काय करावे कळेना. घरी जायचे का? उदय नक्की घरी गेला असेल. बाबांचे व त्याचे बोलणे झाले असले पाहिजे. बाबांना सारे कळले असेल. जाऊ या घरी. व्हायचे असेल ते होईल. तिने त्या टांगेवाल्याला थांबायला सांगितलेच होते. त्याच टांग्यात ती पुन्हा बसली व निघाली आणि घरी आली.
रमाबाई झोपल्या होत्या. विश्वासराव वाचीत पडले होते. सरला हळूच आत आली. पित्याने पाहिले.
“बाबा !”
“येथे का आलीस?”
“तुमची मुलगी म्हणून.”