आशा-निराशा 1
सरला त्या अनाथालयातून बाहेर पडली. ती चंद्रभागेच्या तीरी गेली. तिने स्नान केले. तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि शेवटी स्टेशनवर आली. ती अत्यंत दु:खी होती. कृश झाली होती. जीवनाचा तिला वीट आला होता. परंतु तिला जीवनाचा नाश करवत नव्हता. तुझा उदय तुला भेटेल, असे कोणीतरी तिला मनात म्हणत होते.
ती आगगाडीत बसली. परंतु ती कोठे जाणार, कोठे राहणार? पुण्यास जाणार का? वडिलांकडे जाणार का? वडील काय म्हणतील? त्यांनी विचारले तर काय सांगायचे? वडिलांना कळवू का? उदय येऊन गेला असेल का? पुढे आला तर? वडील त्याला काय सांगतील? एक का दोन, कितीतरी विचार तिच्या डोक्यात थैमान घालीत होते. मनात कोणताही निश्चय होत नव्हता.
ती पुणे स्टेशनवर आली. घरी जावे असे तिला वाटले. परंतु तिला धैर्य झाले नाही. पुन्हा ती निघाली. तिने कल्याणचे तिकीट काढले. उदय जळगावला राहात असे. तिकडे जाणारे कोणी भेटेल, काही हकीगत कळेल, असे तिला वाटले. कल्याणला उतरून मग ठरवू कोठे जायचे ते, असे तिने ठरविले. ती बायकांच्या डब्यात बसणार होती. परंतु एखादे वेळेस कदाचित उदय दिसायचा या आशेने ती पुरुषांच्या डब्यात बसली. त्या डब्यात फारशी माणसे नव्हती. तिच्याकडे कोणाचे विशेष लक्ष नव्हते.
गाडी निघाली. आपापल्या जागी सारी मंडळी बसली. कोणी वर्तमानपत्रे वाचीत होते. कोणी पुस्तक काढून वाचीत होते. कोणी गप्पा मारीत होते. सरला काय करीत होती? ती खिन्नपणे खिडकीजवळ बसली होती. शून्य दृष्टीने पाहात होती.
इतक्यात तिच्या कानांवर संवाद आला. कोणाचे तरी हळू बोलणे तिच्या कानांवर आले. त्या बोलण्यात उदयचा उल्लेख होता.
“आई, उदयचे सुध्दा म्हणे लग्न झाले होते.”
“काही तरी ! त्याने तुझी थट्टा केली. तुझे लग्न ठरलेले पाहून त्याला ईर्षा वाटली असेल. त्याचे तुझ्यावर प्रेम होते.”
“मुळीच नव्हते. मी पाठवलेली कविता त्याने फाडून टाकली होती. परंतु आई, उदयचे डोळे खरेच सुंदर होते, नाही का?”
“नलू, तुझे आता लग्न झाले आहे. तुला काय करायचे त्याच्याशी? आणि आईपाठोपाठ उदयही देवाकडे गेला की काय, ते तरी कोणाला माहीत?”
“त्याच्या आईचे त्यावर किती प्रेम? आजारीपणात सारखी उदय, उदय करायची. परंतु त्याची भेट झाली नाही, दोन दिवस आधी येता तर भेट झाली असती. परीक्षा झाली तरीही तो लौकर आला नाही. आई आजारी हे माहीत, तरी तो पुण्यातच राहिला. आई, त्याच्या त्या सरलेमुळे तो राहिला असेल.”
“कोणाला माहीत? परंतु घरी गेला तो आईचे प्राण गेलेले ! आणि आईचा देह जळत असता तो चितेत उडी घेणार होता. परंतु त्याच्या मामांनी त्याला खसकन ओढले म्हणून बरे. नाही तर जीव देता.”