आजोबा नातू 10
“हो. सरला तिचे नाव. खरोखरच निरपराध निष्पाप मुलगी ! अति दु:खी होती. आणि जाताना म्हणाली, “माझे बाळ कोणाला देऊ नका. मी केव्हातरी येईन. माझे बाळ परत नेईन. सारा खर्च देईन.” जाताना तिने आपली कुडी, हातांतील बांगडया सारे संस्थेस दिले. पुन:पुन्हा ती मुलाचे मुके घेत होती. काय तिची स्थिती झाली असेल ! कल्पना करा. पोटचा गोळा येथे टाकून जायचे. आम्हांला वाईट वाटते. परंतु काय करायचे? त्या माता तरी काय करतील?”
“हा बाळ मला द्या. पाहा तो माझ्याकडे पाहात आहे. सरलेसारखेच नाकडोळे. माझ्या सरलेचाच बाळ. होय, सरलेचाच.”
“तुम्ही सरलेला ओळखता?”
“अहो, माझी मुलगीच ती. मला तिने काही सांगितले नाही. घरातून निघून गेली. परंतु पुढे कळले. अकस्मात कळले. चला, मी सारी हकीकत सांगतो. मी तिचा बाप खरा; परंतु मी कठोर होतो. तिच्याजवळ तुसडेपणाने वागत असे. म्हणून तिला माझ्याजवळ सांगण्याचे धैर्य झाले नाही. अरेरे ! विश्वासरावांनी सरलेच्या मुलाला उचलून घेतले. त्यांनी त्याचे मुके घेतले. बाळ हसला, त्यांना बिलगला. जणू ओळख पटली.
विश्वासराव बाळाला मांडीवर घेऊन सारी हकीकत सांगत होते. त्यांनी उदयचीही वार्ता सांगितली. तो आला होता, आपण त्याला कसे घालविले, ते सारे त्यांनी सांगितले. त्यांनी सरलेच्या वह्या दाखविल्या. उदय, उदय लिहिलेले ते पान दाखविले. “पंढरपुरास जावे का “ वगैरे मजकूर असलेले पान त्यांनी दाखविले. सरलेचे भांडे दाखविले. ते म्हणाले,
“अहो, माझीच ती मुलगी. हा मजकूर वाचून तर येथे आलो. पश्चात्ताप होऊन आलो. घरात मी एकटा. सारी मेली ! आता सरलाच काय ती राहिली. ती जगात असेल का नाही काय सांगावे? तिचे गेल्यापासून पत्र आले का?”
“पत्र आले नाही. कोठे नोकरी मिळती तर पत्र आले असते. परंतु पत्र नाही.”
“हे मूल मी नेतो.”
“परंतु कोणासही मूल देऊ नका असे सरलाबाईंनी निक्षून सांगितले आहे.”
“अहो, मी तिचा प्रत्यक्ष पिता. या मुलाला वाढवीन. सरला आलीच तर सांगा की, “तुझ्या वडिलांनी तुझे बाळ नेले आहे. तूही त्यांच्याकडे जा. त्यांचा तुझ्यावर बिलकूल राग नाही. त्यांना पश्चात्ताप झाला आहे. तुझे बाबा पूर्वीचे राहिले नाहीत.” वाटले तर मी एक पत्र लिहून ठेवतो. ती आली तर तिला ते पत्र द्या. किंवा तिचे पत्र आले तर तिला हे पत्र द्या पाठवून. आणि तरीही तिला तिचे मूल परत पाहिजे असेल तर मी तिच्या हवाली करीन. माझे ऐका. हे बाळ दिलेत तर मी जगेन. माझ्या जीवनात आनंद येईल. नाही तर या चंद्रभागेतच मी प्राणार्पण करीन. कोण आहे मला? कशासाठी जगू?”