भेट 12
“तू मला नावे ठेवली असशील. मी तुला फसवले असे तुला वाटले असेल. परंतु तसे नव्हते हो. स्मृती येताच तुझ्याकडे मी धावत आलो.”
“होय रे उदय. तू माझा आहेस. माझा.”
“चल आपण जाऊ.”
“कोठे जायचे?”
“स्टेशनवर जाऊ.”
“शेटजींकडे जाऊ. त्यांचा निरोप घेऊ. मोटार तेथे उभी आहे. बंगल्यात जाऊ. आणि उद्या जाऊ. त्या शेटजींचे उपकार ! त्यांना सदबुध्दी आली म्हणून हो ही सरला तुला दिसत आहे. चल उदय, ऊठ.”
दोघे हातांत हात घेऊन निघाली.
“उदय, उद्या सकाळी ही दाढी काढ. नीट केस कापून घे. तू माझा साधा, सुंदर उदय हो.”
“स्वामी सेवकरामाचा अवतार संपला म्हणायचा !”
“उदय. आपण सेवाच करू. शेटजींनी एक संस्था सांगितली आहे. परंतु ते पुढे बोलू. उदय, आलास रे परत ! कसा भेटलास ! तुला कल्पना तरी होती का?”
“आणि तुला तरी होती का?”
“मला पहाटे स्वप्न पडले होते. तू पाठीमागून हळूच येऊन माझे डोळे धरीत आहेस असे स्वप्न.” बोलत बोलत दोघे मोटारजवळ आली. तेथे कोणी नव्हते. मोटारीत ड्रायव्हर निजला होता. सरलेने त्याला उठविले. दोघे मोटारीत बसली. बंगल्याजवळ मोटार आली. दोघे उतरली. बंगल्यात गेली. शेटजी बाहेर आले.
“तुम्ही अद्याप झोपला नाहीत शेटजी?”
“नाही. तुझी वाट पाहात होतो. हे कोण?”
“शेटजी, हे ते सेवकराम.”