प्रेमाची सृष्टी 19
“सरले, तू नीट नीज ना.”
“आली झोप तर अशीच जरा पडेन.”
दोघांना पुन्हा झोप लागली.
सकाळ झाली. दोघे जागी झाली होती. त्यांच्या तोंडावर मंदमधुर हास्य होते. किती कोवळी प्रसन्नता, प्रेमळता, कृतार्थता त्यांच्या मुखमंडलावर फुलली होती !
“सरले, आपण दोघे एकमेकांची आहोत.”
“जन्मोजन्मीची एकमेकांची आहोत.”
“आता उठायचे ना?”
“अशीच पडून राहू. वाटते की अशा वेळेस मरण यावे म्हणजे ताटातुटीचे भय नाही.”
“माझा ताप निघाला आहे. तू ऊठ. तोंड धू. घरी जा.”
ती उठली. तिने तोंड वगैरे धुतले. तिने उदयचा घामाचा सदरा धुऊन ठेवला. तिने आपले केस विंचरले. उदयला कढत पाणी तोंड धुवायला दिले. तिने त्याला कोयनेल दिले. तिने त्याचे केस नीट विंचरून त्याचा भांग पाडला. त्याच्याकडे प्रेमाने तिने पाहिले. त्याचे अंथरूण तिने साफ केले. आणि तेथे ती बसली. किती आनंदी दिसत होती ती !
“जा आता, दमलीस.”
“उदय, सार्या जन्मातील शीण आज गेला. आज बाहेर हिंडू फिरू नकोस हो. ताप निघाला आहे. पुन्हा येईल नाही तर.”
सरला गेली. उदयला पुन्हा ताप आला नाही.
दसरा गेला. दिवाळी जवळ येत होती. रमाबाईचे दिवस भरत आले होते. बाळंतपणाला त्या माहेरी जाणार होत्या. या वेळेस सरलेचा हात बाळाला लावू द्यावयाचा नाही असे तिने ठरविले होते. एके दिवशी पतिपत्नी बोलत होती:
“दिवाळीलाच जाऊ.” रमाबाई म्हणाल्या.
“चालेल. परंतु सरला एकटी.” विश्वासराव म्हणाले.
“राहील चार दिवस एकटी, भीती थोडीच आहे?”
“तुला पोचवून मी परत येईन.”
“परंतु दिवाळीला तेथेच रहा. दिवाळीचे सरलेला इकडे घेऊन या.”
असे बेत होत होते. आणि विश्वासराव व रमाबाई गेली. सरला एकटी राहिली. तिला आता स्वातंत्र्य होते. उदयला आपल्या घरी आणू असे तिने ठरविले. उदयने तिचे घर अद्याप पाहिले नव्हते. संधी आली.