पंढरपूर 10
“किती तुमचे उपकार ! तुम्ही जणू मायबाप आहात.” सरलेला बोलवेना.
तिची तेथे व्यवस्था झाली. पोट दुखायचे राहिले होते. ती खिन्न होती. तिने दोन घासही खाल्ले नाहीत.
“नीट खातपीत जा. म्हणजे बाळंतपण नीट होईल. हातीपायी नीट सुटाल. अनुभव आहे का?
“हा पहिलाच अनुभव.”
“म्हणून जपा. असे दु:ख करीत नका बसू. त्या बाळासाठी तरी नीट राहा.
“मी माझीच काळजी करीत होत्ये. माझ्याच विचारात मी मग्न होत्ये. माझ्या बाळाचा विचार मी केलाच नाही. आईच्या दु:खाने आरंभापासून तो जणू दु:खी. बाळ, तू नको दु:खी होऊ. तू हस, माझ्या पोटात हस, बाहेरही हस. माझ्याजवळ अश्रू भरपूर आहेत. तुझ्याजवळ भरपूर आनंद असो. माझ्या जीवनातील सारे चांगले ते तू घेऊन ये. माझ्यात अमृताचा काही अंश असला तर तो तू घेऊन ये. माझे विष तुला न बाधो !” असे ती म्हणे.
दोनचार दिवस गेले. तिच्याजवळ कोणी येत. बसत. तेथे काही स्त्रिया होत्या. अशाच अनाथ मातांची परित्यक्त मुले तेथे होती. त्या मुलांकडे पाहून अपार वाईट वाटे. आईबापांपासून दूर असणारी मुले ! समाजाच्या दयेवर पोसली जाणारी मुले ! परंतु त्या मुलांच्या माता जेथे असतील तेथून नसतील का वार्याबरोबर आशीर्वाद पाठवीत? नसतील का प्रेम पाठवीत? एकान्तात त्या पोटच्या गोळयांना स्मरून त्या नसतील का स्फुंदत, सद्गदित होत? त्या मुलांना स्मरून त्यांचे स्तन नसतील का भरून येत? हृदय नसेल का ओसंडत?
आणि तेथे असणा-या परित्यक्त मातांचे, वंचित मातांचे नाना अनुभव. ती एक कामगार भगिनी होती. तिला नवरा नव्हता. एका गिरणीत ती कामावर होती. जरा रूपाने बरी होती. आणि मालकाच्या कोणा नातलगाची दृष्टी गेली. आणि त्याचा परिणाम तिच्या येथे येण्यात झाला.
“परंतु येथे तरी पाठवावयाची व्यवस्था केली त्याने.” सरला म्हणाली.
“पैशाने सारे करतात. माझ्या घरच्यांची पैशाने त्याने समजूत घातली. मी तिची व्यवस्था करतो म्हणाला.”
“तुम्ही त्याच्यावर फिर्याद करायची.”