उदय 4
“तिची हकीगत विचारायलाच मी आलो आहे.”
“तुम्ही कोण?”
“माझे नाव उदय.”
“उदय?”
“हो.”
“सरलेचा व तुमचा काय संबंध? कसली माहिती पाहिजे तुम्हाला? आत या. आपण का सी.आय.डी. मधले आहात? कोणी गुप्त पोलिस खात्यातले आहात? कोठे आहे सरला? या, आत या. तू जरा खाली जा ग.”
रमाबाई बाळाला घेऊन खाली गेल्या. विश्वासराव व उदय तेथे बसले होते.
“तुम्ही कोठले?”
“मी खानदेश-वर्हाडकडचा आहे. येथे पुण्याला शिकत असे. यंदा बी.ए. झालो.”
“सरलेची कोणती हकीकत तुम्हांला पाहिजे?”
“ती कोठे आहे?”
“मलाही माहीत नाही. एके दिवशी घरातून ती नाहीशी झाली. दोन महिने झाले असतील. अधिकच. पत्र नाही, निरोप नाही. त्या दिवशी मध्यरात्री ती एकटीच गच्चीत होती. मला झोप येत नव्हती, म्हणून मी गच्चीत गेलो. तो तेथे सरला होती. मी तिला म्हटले जाऊन नीज. ती निजायला म्हणून गेली. परंतु सकाळी पाहतो तो ती खोलीत नाही. ती कधी कधी फिरायला जात असे. उशिरा येत असे. मैत्रिणीकडे गेल्ये होत्ये असे सांगे. तशीच गेली असेल असे वाटले. परंतु दुपार झाली तरी ती आली नाही. मी शोधणार तरी कोठे? येईल एक दिवस अशी आशा आहे.”
“तुम्ही तिचा शोध नाही केला?”
“कोठे करू शोध? परंतु तुम्हांला का उत्सुकता? सरलेची नि तुमची का ओळख आहे?”
“हो.”
“किती दिवसांपासूनची ओळख?”
“मागल्या वर्षाची ओळख. परंतु तसे म्हणाल तर आमची जणू जन्मोजन्मीची ओळख आहे. आम्ही एकमेकांस पाहिले व एकदम ओळख पटली. तो दिवस मी विसरणार नाही. सरला एका दगडावर डोके फोडीत होती. मी धावलो. तिच्या कपाळावर पट्टी बांधली.”