आशा-निराशा 16
दुसर्या दिवशी सकाळच्या गाडीने सरला गेली. नलू निरोप द्यायला आली होती. गाडी सुटताना दोघीचे डोळे भरून आले. सरलेला आशा वाटत होती. उदय भेटेल. त्याला स्मृती येईल असे वाटत होते. परंतु त्याचा मामा काय म्हणेल? त्या मामाला आवडेल का? उदयने मला ओळखले की, माझे काम झाले. परंतु आधी सुखरूप भेटू दे. या डोळयांना तो दिसू दे.
आशा-निराशांवर हेलकावत ती जात होती. पांढरकवडयास कसे जायचे वगैरे सारी माहिती तिने घेतली होती. शेवटी पांढरकवडयास ती आली. तिने एक टांगा केला. टांगेवाल्याला उदयच्या मामाचे घर माहीत होते. त्याने नेमका टांगा केला. सरला त्याला म्हणाली, “टांगा जरा येथेच थांबव.” टांगेवाला थांबला होता. सामान टांग्यातच होते.
मामांची मुले बाहेर आली. मामी बाहेर आल्या.
“कोण पाहिजे तुम्हांला?”
“येथे उदय आहेत ना?”
“उदय गेला.”
“कोठे?”
“पुण्याला गेला.”
“ते आजारी ना होते? त्यांची स्मृती ना गेली होती?”
“परंतु अकस्मात स्मृती आली. तो एखादे वेळेस सरला सरला म्हणे-शेवटी आम्ही त्याची ट्रंक उघडली. तो तीत फोटो, पत्रे. तो फोटो त्याला दाखवताच तो ताडकन उठला. त्याला स्मृती आली. सारे त्याला आठवले. आश्चर्यच झाले.”
“ते केव्हा गेले?”
“ते त्याला जरा रागे भरले. आई इकडे आजारी असता तिकडे प्रेमात रंगला होतास असे बोलले. त्याला सहन झाले नाही. तो सामान घेऊन निघून गेला.”
“प्रकृती बरी होती का?”
“अशक्तता खूप होती. त्याला किती सांगितले की असा रागावून जाऊ नकोस. तरी तो गेला. तुम्ही कोण?”
“मी सरला.”
“अगबाई ! तुम्ही का त्या?”
“हो आई. यांचाच फोटो होता, त्यात.”