प्रेमाची सृष्टी 17
“नको सरले. येथे निजशील कोठे?”
“मी जागायला येत आहे. तुझ्याजवळ बसायला. काही लागले सवरले तर द्यायला. मी का उदय परकी आहे? मी तुझी नाही का?
जाऊन परत येते हां.”
ती गेली. घरी आली.
“सरले किती उशीर?” रमाबाई म्हणाल्या.
“आई, एक मैत्रीण आजारी आहे. खूप ताप तिला आला आहे. येथे ती एकटीच शिकायला असते. कोण आहे तिला? बसल्ये होते तिच्याजवळ. मी जेवून आईबाबांना विचारून येत्ये, असे तिला सांगून आल्ये. जाऊ का मी? बाबा कोठे आहेत?”
“ते आज उशिरा येणार आहेत. तू जा जेवून.”
“बाबांना तू सांग.”
“सांगेन.”
सरला पटकन जेवली. घरातले कोयनेल तिने बरोबर घेतले. अमृतांजन घेतले. थर्मामीटर घेतले.
“आई, थोडे दूध देतेस?”
“ने. भांडे आण परत.”
सरला सामान घेऊन निघाली. उदयला ताप आला म्हणून तिला वाईट वाटत होते. परंतु त्याची शुश्रूषा करता येईल, त्याच्याजवळ बसता येईल, म्हणून तिला आनंदही होत होता. वेडे मन !
सरला आली. उदय गुंगीत होता. तिने त्याच्या कपाळाला हळूच हात लावला. तो जागा झाला.
“काय रे उदय, कसे वाटते?”
“तू कशाला आलीस?”
“तुझी म्हणून आल्ये. मी ताप बघत्ये हो किती आहे तो. हे थर्मामीटर लाव. झटकले आहे. लाव.”
त्याने ते लावले. थोडया वेळाने त्याने काढून दिले. तिने ताप पाहिला.
“बराच आहे रे ताप. तीनहून अधिक आहे.”
“कपाळ दुखते का रे?”