बाळ, तू मोठा हो 5
घरी गेल्यावर बंडूने आपल्या आईला सारी हकीगत सांगितली. ती श्रीमंत आई संतापली. उदयच्या आईला ती बोलली,
“बराच आहे मस्तवाल तुमचा मुलगा. बंडूला मी कधी चापटसुध्दा मारली नाही. तुमच्या मुलाने आज त्याला मारले. त्याला कोट व शर्ट दिला त्याचे हे उपकार वाटते? मेली भिकारी तर भिकारी; परंतु ऐट कोण? ऐट राजाची, अवलाद घिसाडयाची. तुम्ही उद्यापासून येऊ नका कामाला. आश्चर्यच एकेक.”
उदयची आई रडू लागली. तिने मुलाच्या वतीने क्षमा मागितली. म्हणाली, “क्षमा करा, कामावरून दूर नका करू. मी उदयला शिक्षा करीन. आम्ही निराधार आहोत. क्षमा करा.” इतक्यात उदयच तो कोट, तो शर्ट घेऊन तेथे आला.
“आई, मला नको हा कोट, नको हा शर्ट.” असे म्हणून त्याने ते कपडे तेथे फेकले.
मातेने त्याची बकोटी धरली. ती रागावली.
“काटर्या, माजलास होय तू? घे ते कपडे. आणि बंडूला आज तू मारलेस? तुला लाज नाही वाटली? तुझी आई येथे काम करते ते माहीत नाही? उद्या येथून मला काढले तर खाशील काय? जा, त्यांची माफी माग. त्याच्या आईच्या पाया पड. चल येतोस की नाही?” असे म्हणून आई त्याला मारत होती. ती त्याला ओढीत मालकिणीकडे नेत होती. उदयही हट्टास पेटला होता.
“मार, वाटेल तितके मार. मी माफी मागणार नाही. कोणाच्या पाया पडणार नाही.” असे तो रडत म्हणत होता. मालकीणबाई, तिची मुले सारी तेथे जमली.
“पड त्यांच्या पाया. पडतोस की नाही?”
“नाही. जीव गेला तरी नाही पडणार.”
“जाऊ द्या. नका मारू. पुन्हा नाही तो असे करणार.” असे बंडूचे वडील येऊन म्हणाले. उदय रडत घरी गेला. माता रडत स्वयंपाकघरात गेली. ती श्रीमंत मुले हसत हसत खेळायला गेली.
रात्री उदयची आई घरी आली. उदय जेवला नव्हता. त्याची आई त्याच्यासाठी जेवण करून ठेवून जात असे. आज ते जेवण तसेच होते. उदय झोपला होता. परंतु त्याला खरोखर झोप लागली होती का? माता बाळाजवळ जाऊन बसली. ती एक शब्दही बोलली नाही. ती त्याला थोपटीत होती. त्याच्या अंगावरून ती हात फिरवीत होती. मध्येच तिने खाली वाकून पाहिले. तिच्या डोळयांतील अश्रू उदयच्या तोंडावर पडले आणि उदयला जोराचा हुंदका आला. स्फोट झाला. दाबून ठेवलेले दु:ख जोराने उसळून बाहेर आले. आईने मुलाला जवळ घेतले. कोणी बोलू शकत नव्हते. थोडया वेळाने माता मुलाला म्हणाली, “उदय, चल बाळ. दोन घास खा.”
“नको आई, आज पोट भरलेले आहे.”
“कशाने रे भरले?”
“माराने, अपमानाने, दु:खाने.”