आजोबा नातू 4
आता रात्र झाली. बाहेर अंधार होता. कृष्णपक्ष होता. चांदणे नव्हते. विश्वासराव बाळाला घेऊन गच्चीत गेले. तेथे त्याला घेऊन ते हिंडत होते. थोडया वेळाने तेथे लहानशी गादी घालून त्यावर त्यांनी बाळाला ठेवले. बाळ वर आकाशाकडे पाहात होता. आणि हळूहळू त्याचे रडणे थांबले. सारखी टक लावून ते मूल आकाशाकडे पाहात होते. ते चमकणारे सुंदर तारे ! त्यांच्याकडे तो बाळ बघत होता. तो मुठी नाचवू लागला. पाय नाचवू लागला. आणि पाहा किती हसतो आहे ! कोठे रे गेले सारे रडणे? आणि आता झोप नाही का तुला येत? सार्या दिवसात निजला नाहीस. नीज जरा. परंतु नाही. डोळयांवर नीज नाही. सारखी वर तार्यांकडे हसरी दृष्टी. रमाबाई वर आल्या.
“राहिले वाटते रडू? बघा खेळतो आहे ! झोप नाही का येत? ये मांडीवर नीज.” असे म्हणून त्यांनी त्याला जवळ घेतले. प्यायला घेतले. तो बाळ पुन्हा रडू लागला.
“काय रे झाले राजा ! नको का दूध? आज थेंबभरसुध्दा प्यायला नाहीस. का रे नाही तोंड लावीत?”
“त्याला ठेव खाली. गादीवर खेळू दे.”
आणि काय आश्चर्य ! गादीवर ठेवताच ते मूल पुन्हा हसू लागले. ते आईबापांकडे पाहात नव्हते. टक लावून सारखे आकाशाकडे पाहात होते. ते अनंत तारे जणू त्याच्याजवळ बोलत होते. त्याच्याजवळ ते हसत-खेळत होते. बाळाला झोप नाही. सारखा वर बघे नि हसे. त्या विशाल सृष्टीकडे ते लहान लेकरू बघत होते. काय वाटत होते त्याला? का इतका आनंद? का हे हास्य? क्षुधातृषा सारी हरपली. झोप उडाली. केवळ अपार आनंद ! त्या लहानग्याच्या हृदयात तो आनंद जणू मावत नव्हता. तो आनंद उतू जात होता. त्याच्या नाचणार्या मुठींतून, प्रेमळ डोळयांतून, ओठांवरील हास्यातून तो आनंद बाहेर उसळत होता.
दहा वाजले, आकरा वाजले, बारा वाजले, बाळ झोपला नाही.
“मी त्याला खाली नेत्ये. पाळण्यात घालत्ये. जरा झोपला तर बरा.” असे म्हणून रमाबाईंनी त्याला उचलले व खाली नेले. परंतु एकदम लेकरू ओक्साबोक्सी रडू लागले. मातेने लक्ष दिले नाही. ती त्याला तशीच आंदुळीत होती. गाणी म्हणत होती. ओव्या म्हणत होती. परंतु बाळाचे रडणे सुरू. माता रडकुंडीस आली. तिने त्याला प्यायला घेतले. ते तोंड लावीना. काय करायचे? ती त्याला पुन्हा वर गच्चीत घेऊन आली. गार वारा सुटला होता. थंडी होती. थंडीचेच दिसत होते. गुरंगटून त्या गादीवर ठेवताच बाळाचे रडे थांबले. त्या मुलाला खालच्या भिंती का आवडत नव्हत्या? त्या संकुचित खोलीतील सृष्टी का रूचत नव्हती? विशाल विश्वाशी का एकरूप व्हायची त्याला इच्छा होती? ना बंधन, ना मर्यादा. सभोवती मोकळा वारा, वर मोकळे अनंत आकाश, नि ते अनंत तारे ! निर्मळ सतेज ! खालच्या घरात, त्या खोल्यांत का क्षुद्रता भरलेली होती? तेथे का द्वेषमत्सर होते? संकुचितपणा होता? त्या बाळाला विशाल जीवनाची, निर्मळ जीवनाची का भूक होती? कोणाला माहीत !