उदय 3
“मी जातो. जरा जाऊन येतो. सामान असू द्या येथे.”
“चहा घेऊन जा. मी आता करतो.”
“चहा नको.”
“वा: ! तुमच्यासारख्यांना चहा देण्याचे भाग्य कधी मिळणार? ही खोली म्हणजे तुमचे प्रेममंदिर होते. बसा.”
उदय बसला. त्या मित्राने चहा केला. उदयने चहा घेतला व तो निघाला. तो कोठे जाणार होता? सरलेची कोठे करणार तो चौकशी? सरलेच्या वडिलांकडे तो जायला निघाला. त्याला ते घर माहीत होते. त्या घरात त्याने प्रेमाची दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या प्रेमाची परिपूर्ती तेथे झाली होती. त्या घरात त्याने सरलेच्या कपाळावर कुंकू लावले होते. त्या घरातच सरला व तो एकरुप झाली. अशा त्या घराकडे जायला तो निघाला.
दुपारचे तीन वाजायची वेळ होती. चहाची वेळ होती. रमाबाई आपल्या नव्या बाळाला घेऊन बसल्या होत्या. आरामखुर्चीवर विश्वासराव होते. दोघे बोलत होती.
“सरलेचा पत्ता नाही. ही गेली तरी कोठे?”
“परंतु तिचा विचार कशाला करता? काहीतरी बरेवाईट तिने केले असेल. गेली असेल निघून. बाळाला हात तरी नको लागायला. तुमची सरला खरेच का अशी आहे? जाईल तेथे सत्यानाश करणारी?”
“इतर सर्व गोष्टींचा नाश तिने केला तरी मला पर्वा नव्हती. परंतु माझ्या अब्रूचा नाश न करो. माझ्या तोंडाला काळे न फासो.”
“ही तुमची मुलगी असे कोणाला कळणार आहे?”
“अग, तूच उद्या माहेरी बोलशील.”
“परंतु तुमची अब्रू ती का माझी नाही?”
विश्वासराव सचिंत बसले होते. तो दारात उदय उभा राहिला.
“कोण पाहिजे?”
“आपणच का सरलेचे वडील?”
“हो.”
“तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.”
“तुम्हांला सरलेची हकीगत आहे का ठाऊक?”