आजोबा नातू 12
“कशाला आणलेत ते मूल? जातकुळी माहीत नाही. कसे निघते काय सांगावे?”
“आपण तरी का सद्गुणांचे पुतळे आहोत? देव सर्वत्र आहेत ना? सारे ऋषी असेच नव्हते का जन्मले? परंतु त्यांचे तुम्ही स्मरण करता, तर्पण करता. खरे ना?”
“तुम्ही आधुनिक दिसता.”
“भटजी, तुम्ही का त्रेतायुगात आहात? तुम्हीही आधुनिकच आहात. आणि ऋषींच्या कुलकथा त्रेतायुगातीलच आहेत. असो. चर्चा नको. तुम्ही मला एक मोठी बाटली दूध भरून द्या. जाताना द्या. मी पैसे देईन. तुमचाही हिशोब करा.”
भटजींचा हिशोब पुरा करण्यात आला. बाजारातून नातवाला सुंदर कपडे आजोबांनी आणले. त्यांनी आपल्या हातांनी त्याला ते चढवले आणि ते परत पुण्याला निघाले. पंढरपूरचा जिवंत प्रसाद घेऊन ते पुण्यास परतत होते. पांडुरंगाची जणू ती प्रेममय मूर्ती होती. तिला घेऊन ते जात होते.
विश्वासराव गाडीत बसले होते. मांडीवर बाळ होता. त्याच्या तोंडात रंगीत रिंगणे होते. शेजारी बसलेल्या लोकांना आश्चर्य वाटत होते. हा म्हातारा एकटाच लहान मुलाला कोठे नेत आहे? कोणी त्याच्याबरोबर कसे नाही? आणि बाळ किती सुंदर आहे ! त्याला घ्यावे असे सर्वांना वाटत होते. त्याचे कौतुक करावे असे सर्वांना वाटत होते.
विश्वासराव आपल्या घरी आले. पहाटेची वेळ होती. बाळ खांद्याशी निजलेला होता. त्यांनी बाळाला काही खाली घालून त्यावर ठेवले. नंतर त्यांनी दार उघडले. मग त्यांनी बाळाला आत नेऊन निजविले. सामान सारे आत आणले. घरात दिवा लागला. ते त्या चिमण्या बाळाकडे पाहात होते. बाळाला घेऊन ते झोपी गेले. आणि त्यांच्या आधी बाळ उठला. तो खेळत होता. हसत होता. परंतु विश्वासरावांना ओले ओले लागले. ते जागे झाले.
तुतरी केलीस वाटते ! केव्हारे उठलास? रडू नको हो. तुझी आई येईल हो. येईल ना तुझी आई? येईल ना सरला? येईल ना उदय? नुसता हसतोस काय गुलामा? असे म्हणून त्यांनी बाळाचे मुके घेतले.
त्यांनी तो रंगीत पाळणा टांगला. रमाबाईच्या बाळाचा पाळणा. त्या पाळण्यावर चिमण्यांचा चांदवा त्यांनी लावला. आणि भांडी घासणारी मोलकरीण आली. त्यांनी तिला सांगितले, “बाळाला रोज न्हाऊमाखू घालीत जा. तुझे हे काम.”
“कोठून आणलात बाळ?”
“माझा हा नातू हो.”
“कसा हसतो आहे बघा.”
पाणी तापले. मोलकरणीने बाळाच्या अंगाला दूधहळद लावली. तेल लावले. तिने त्याला न्हाण घातले. तीट लावली. नंतर तिने त्याला थोडे दूध पाजले आणि पाळण्यात बाळ निजला.