उदय 1
उदयची हकीगत सांगायची राहिलीच. ती सारी नीट सांगतो, ऐका. स्मृतिहीन उदयला सरलेचा फोटो दिसताच एकदम स्मृती आली. तो एकदम उठून उभा राहिला. त्याच्या दुबळया शरीरात बळ आले. सरलेचे जीवन त्याच्या डोळयांसमोर आले. तिचे दिवस भरत आले होते. ती कोठे असेल, तिने काय केले असेल, सारे विजेप्रमाणे त्याच्या मनासमोर आले. आणि तो एकदम मामांकडून निघून गेला. त्याला चिंता वाटत होती. सरलेची काय स्थिती झाली असेल असे मनात येऊन तो दु:खी होई. कावराबावरा होई. उदयने आपल्याला फसविले असे का तिला वाटले असेल? अरेरे, तिने का जीव दिला असेल? ती घर सोडून गेली असेल का? कोठे असेल ती? तिचा कठोर पिता तिला राहू देणार नाही. तो नाही नाही ते बोलला असेल. सरले, सरले, तू माझ्या नावाने टाहो फोडला असशील ! तू पूर्वी माझ्याकडे यायचीस व मला हळूच स्पर्शून उदय, उदय, अशा गोड हाका मारायचीस. परंतु या वेळेस तू दु:खाने हाका मारल्या असशील. काय करू मी? भेटशील का तू, दिसशील का तू? “उदय, तू परत भेटणार नाहीस असे वाटते. तुला धरून ठेवावे, सोडू नये असे वाटते.” असे तू म्हणायचीस. परंतु खरेच तुला पुढचे दिसत होते की काय? सरले, तू नाही भेटलीस तर मी कशाला जगू? मला तरी कोण आहे जगात? ना आई ना बाप. ना मित्र ना सखा. कोणता आहे मला आनंद? कसले आहे सुख? कोणाचे प्रेम चाखू? कोणाला प्रेमाने देखू? नको हे जीवन ! नको. नि:सार जीवन ! उदास भयाण जीवन !
अशा विचारात उदय होता. त्याला गळून गेल्यासारखे वाटत होते. तो शून्य दृष्टीने पाहात होता. असे करता करता कल्याण आले. आणि पुण्याकडे जाणारी गाडी आली. तीत तो बसला. पुण्यात कोठे जायचे याचा तो विचार करीत होता. माझी खोली असेल का? भैय्याने राखून ठेवली असेल का? का सरला माझ्या खोलीत राहायला आली असेल? तेथे ती दिसेल का? बाळाला खेळवीत असेल. त्याला पाजीत असेल. सरले, कोठे असशील तू? कोठे असेल तुझे बाळ, आपले बाळ?
पुणे आले. तो स्टेशनवर उतरला. टांगा करून तो त्या जुन्या खोलीवर गेला. खोलीला कुलूप होते. परंतु ते नवीन कुलूप होते. भैय्याही तेथे नव्हता. त्याने भैय्याला हाका मारल्या. भैय्या आला.
“काय भैय्या, काय करीत होतास?”
“तिकडे मोरीत होतो, केव्हा आलेत?”
“हा आताच. खोलीत कोण राहते?”
“एक विद्यार्थी. तुमची खूप वाट पाहिली. शेवटी दिली खोली भाडयाने.”
“आता मी कोठे राहू?”
“येथे सामान ठेवा. या खोली बघून. वाटेल तितक्या खोल्या मिळतील.”
“परंतु ही चांगली होती. एका बाजूला. कोणाची फार ये-जा नाही. शांत.”
“तुम्हा दोघांना ही कशी पुरेल?”
“कोण दोघे?”
“त्या बाई येत असत त्या. तुम्ही म्हणत असा एकमेकांना की आपण नवा संसार मांडू. माझ्या कानांवर येत असे.”