भेट 3
“आपण त्यांना पाहू. आर्यसमाजाने गुरूकुले चालविली आहेत. मुलांसाठी, मुलींसाठी. आपणांकडे अशा संस्था नाहीत. स्त्रियांसाठीही संस्था हव्यात. अनाथांना आश्रम देणार्या; त्यांना तेथे आश्रय देऊन स्वावलंबी बनविणार्या. मनात किती विचार येतात, किती कल्पना येतात.”
“परंतु एक काही तरी निश्चित करावे आणि त्यासाठी सारे आयुष्य द्यावे. मर्यादित क्षेत्र हाती घेऊन तेथे सर्व शक्ती ओतावी म्हणजे थोडेफार तरी करता येते. समाधानही मिळते.”
“मग आज रात्री जायचे ना?”
“तू म्हणत असशील तर जाऊ. परंतु मला थकल्यासारखे वाटत आहे.”
“तुमच्या मनावर कालपासून खूप ताण पडला आहे. होय ना?”
“होय. नवे जीवन जणू मिळत आहे. जुनी कात टाकताना अशाच वेदना होतात.”
“परंतु मला तर अपार सामर्थ्य वाटत आहे. अगदी हलके वाटत आहे. जणू मला पंख फुटले आहेत. किती दिवसांत असा अनुभव नव्हता.”
“कारण तू बंधनात होतीस. अति संकटात होतीस.”
“आणि तुम्ही सोडवलेत. तुमचे उपकार.”
“तू मलाही सोडवलेस जुन्या विचारांच्या तुरुंगातून, जुन्या रूढींच्या शृंखलातून मलाही तू मुक्त केलेस. मलाही आज अपार आनंद झाला पाहिजे. होत आहे. परंतु जरा उदासीनताही आहे.”
“मी एकटीच जाऊ?”
“मोटारीतून जा. म्हणजे रस्त्यात कोणी गुंड भेटणार नाहीत.”
“बरे तर. तुम्ही विश्रांती घ्या. मी एकटीच जाईन. बरोबर हा रामाचा शेला आहेच. कोणी तरी म्हटले आहे :
‘निर्बल के बल राम’