भेट 13
“तुझी त्यांची ओळख निघाली वाटते?”
“हो. फार ओळख. चला, तुम्हांला त्यांची ओळख करून देत्ये. वर गच्चीत बसू. चंद्रही चांगला वर आला आहे.”
आणि सारी गच्चीत गेली. सरलेने वृत्तान्त सांगितला. शेटजी ऐकत होते.
“तुझे स्वप्न खरे ठरले !”
“होय शेटजी. परंतु हे सारे तुमच्यामुळे.”
“रामरायाच्या कृपेमुळे !”
“शेटजी, आम्ही दोघे उद्या पंढरपूरला जाऊ. बाळाला आणू.”
“मी मुंबईस उद्या जाईन. तुम्ही पुढे दोघे मुंबईस या.”
“शेटजी, आता उदय आहे. तो कोठे नोकरी करील. आता आम्ही नीट राहू.”
“उदय तुम्ही का नोकरी करणार? तुम्ही सेवकराम नाव घेतले होते. सेवक व्हा. ठाणे जिल्ह्यात आदिवासी सेवा मंडळ म्हणून नवीन संस्था आहे. तुम्ही तिला मिळा. मी लाख रूपयांची देणगी देईन. संस्था नावारूपाला आणा. तेथील दीनदरिद्री जनतेत चैतन्य ओता.”
“शेटजी, कोठेतरी असे कार्य करावे हेच माझ्याही मनात आहे. आम्ही मुंबईस तुमच्याकडे येऊ व पुढे बोलू. उद्या आम्ही जाऊ ना मग?”
“हो, जा. बाळाला भेटा. आणि आता मी जातो. मला झोप येत आहे. तुम्ही पोटभर बोला. तुमची हृदये उचंबळत असतील. प्रभुकृपेने एकत्र आला आहात. पुन्हा तुमचा वियोग न होवो.”
असे म्हणून शेटजी गेले. सरला नि उदय तेथे बसली होती. आणि तीही थोडया वेळाने भावनांच्या समुद्रावर हेलावत निजण्यासाठी निघून गेली. देवाच्या लाडक्या लेकरांनो, शांत झोपा.