आजोबा नातू 5
बाळ हसत होता. सारखी वर टक लावलेली. रमाबाई रडू लागल्या. विश्वासराव खिन्न होते. मूल हसत असता, खेळत असता ते आईबाप का बरे खिन्न? मूल हसत असताना आईबाप का रडतात? लहान मुलाचे हास्य पाहून रडणारे रडे विसरतात. आणि येथे असे का उलटे?
“बाळाचे लक्षण काही ठीक नाही.” रमाबाई म्हणाल्या.
“त्याला कसला एवढा आनंद होत आहे?”
“काही कळत नाही. दिवसभर रड रड रडला. आता सारखा हसत आहे. हा का हर्षवायू? काय आहे हे? डॉक्टरला तरी बोलवा.”
“त्याला खरेच आनंद वाटत असेल. बघू दे देवाचे तारे. तू वाटले तर पड जरा.”
“मला का झोप येईल?”
“मग बस.”
आईबाप तेथे बसले होते. पहाटेची वेळ होत आली. ठळक ठळक तारे गंभीर दिसत होते. प्रशांत दिसत होते. बागेतील फुले फुलली होती. मंद सुगंध येत होता. आणि बाळाने सभोवती पाहिले. आईकडे पाहिले. बाबांकडे पाहिले.
“काय रे राजा, झोप नाही का येत?” आईने विचारले. आईच्या बोटाशी बाळ खेळत होता. वर बघत होता. हसत होता. विश्वासरावांनी खाली वाकून त्याचा मुका घेतला. बाळाने आनंदाने उसळी मारली.
आणखी थोडा वेळ गेला. बाळाने पुन्हा सारखी वर टक लावली. तारे कमी कमी होत चालले. आणि बाळाचे हसणे मंद मंद होऊ लागले. त्याचे डोळे जणू दमले. ते मिटू लागले. झोप का येणार सोन्याला? हळूहळू ती नेत्रकमले मिटली. बागेत फुले फुलत होती. झाडांवरून पाखरे उडू लागली होती. सूर्योदय होत होता. सृष्टीची निद्रा दूर होत होती. सर्वत्र जागृती येत होती. आणि बाळ? बाळ झोपला. शांतपणे झोपला !
“झोप का हो लागली?” रमाबाईंनी विचारले.
“असे वाटते.” ते म्हणाले.
“हळूच नेऊ का खाली? ठेवू का पाळण्यात? येथे गारठला असेल. रात्रभर येथे थंडीत होता. अंगाभोवती पांघरूण टिकू देत नव्हता. सारखे हातपाय नाचवी. नेऊ का खाली?