बाळ, तू मोठा हो 7
“सांगेन त्याला. परंतु येईल की नाही काय सांगू?”
उदय दुसर्या दिवशी जेवायला गेला. तो त्या सर्व मंडळीत उमटून दिसे. तो आज आनंदी होता. आज त्याला अभिमान वाटत होता. आज त्या श्रीमंत घरचे सन्मानपूर्वक त्याला आमंत्रण आले होते. तो आज हसत होता. विनोद करीत होता. नलीने त्याला विडा दिला.
“सिगारेट हवी का रे?” बंडूने विचारले.
“मी ओढीत नाही” उदय म्हणाला.
“अरे, बी.ए.च्या वर्गात नि अद्याप सिगारेट ओढीत नाहीस? असा कसा तू उदय? अरे, ही नलीसुध्दा सिगारेट ओढते.”
“नाही रे उदय, दादा काही तरी सांगतो.”
“नल्ये, त्या दिवशी नाही ओढलीस?”
“ती आपली गंमत. उदय, तो विडा खा ना. का विडाही खात नाहीस? अगदीच सोवळा दिसतोस !”
“सोवळा कसला? अरसिक आहे. उदय, या गोष्टी नसतील तर विद्येला रंग चढत नाही. जीवनाला रंग येत नाही. असा भुक्कड नको राहू.”
“बंडू, मी एका स्वयंपाकीणबाईचा मुलगा. मी कोठून चैन करू? मी फाटका कोट घालावा, जुनी पुस्तके घ्यावी. तुमची गोष्ट निराळी आहे. तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघतो म्हणून तुम्ही तोंडातून धूर काढू शकता. खरे ना?
“तू लहानपणाच्या गोष्टी अद्याप विसरला नाहीस वाटते?”
“काही काही गोष्टी आपण कधी विसरत नसतो. सारे अपमान विसरण्याइतका मोठया मनाचा मी नाही. परंतु आज माझ्या मनात राग नाही. मी गरीब आहे. गरिबीतच राहिले पाहिजे.”
“अरे, उद्या श्रीमंत होशील. एखाद्या श्रीमंताची मुलगी माळ घालील.”
“मी श्रीमंत असतो तर श्रीमंताची मुलगी माळ घालती. मी गरीब आहे.”
“जाशील आय.सी.एस.ला आणि एखादी मड्डमही घेऊन यायचास.”