पंढरपूर 4
आणि त्याने तिला ढकलले. तिचा हात त्याला कढत लागला.
“ताप आला आहे की काय?”
“हो.”
“जा, जाऊन पड. येथे उभी कशाला?”
“बाळाला बघायला.”
“त्याच्याकडे नको बघूस. त्याला नको घेऊस.”
सरला वर गेली. आपल्या खोलीत जाऊन डोक्यावर पांघरूण घेऊन पडली. ती मुसमुसत होती. “देवा, दे रे मला मरण” असे ती प्रार्थीत होती. परंतु कोण ऐकणार तिची प्रार्थना?
सरलेचा ताप निघाला. दुसर्या दिवशीच निघाला. ती टांगा करून त्या खोलीवर गेली. तो त्या खोलीत दुसरेच कोणी होते.
“कोण पाहिजे तुम्हांला?”
“येथे का तुम्ही राहता?”
“हो. मी कालच ही खोली घेतली.”
“परंतु ही दुसर्याची होती.”
“उदय नि सरलेची का?”
“उदय नि सरला कोण?”
“येथे भिंतीवर ती नावे आहेत? भिंतीवर एक चित्र आहे. वेल आहे. तिच्यावर दोन पक्षी आहेत. आणि सरला नि उदय असे तेथे लिहिलेले आहे.”
“माझा एक मित्र ही खोली घेणार होता. तो लवकरच येणार होता. भैय्याला सांगून तो गेला होता.”
“भैय्यानेच तर मला ही खोली दिली. भाडयाने देणे आहे अशी पाटी होती. कालच त्याने ती काढली.” इतक्यात भैय्याच तेथे आला.
“का रे भैय्या ही खोली यांना दिलीस?”
“तुमच्या यजमानांचा पत्ता कोठे आहे? आणि तुम्हाला एवढीशी जागा कशी पुरेल? तुम्ही शिकलेली माणसे. का आमच्यासारखा एका खोलीत तुमचा संसार मावणार आहे? आणि आता कॉलेजे सुरू होणार; किती दिवस वाट बघायची?”