भेट 7
“तुही आज जागृत झाला आहात. “जो जागत है वो पावत है.” तुमचा उध्दार आता जवळ आला आहे. आपले नागरिकत्वाचे हक्क जिंकून घेण्यासाठी तुम्ही सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेत आहात. फार सुंदर आहे ही गोष्ट. तुमच्या सत्याग्रहात सामील होण्यासाठी मी आलो आहे. तुमच्याबरोबर मलाही घ्या, मला स्पृश्य नका समजू. अस्पृश्यच समजा. तुमच्यातील एक समजा.
“बंधूंनो, तुही राममंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करणार आहात. ठीक आहे. परंतु मला आपले कधी कधी वाटते की मंदिरात शिरण्यासाठी कशाला धडपड? काय आहे त्या मंदिरात? तेथे आज देव नाही. तेथे पावित्र्य नाही, क्षेत्रस्थानातील मंदिरे म्हणजे घाण वाटते. तेथे दंभ, व्यभिचार यांचे साम्राज्य आहे. या मंदिरांतून देव नाही. कशाला तेथे जाता? तुम्ही याहून थोर धर्म घ्या. मंदिरातील मूर्ती म्हणजे एक खूण आहे. ईश्वराची एरव्ही कल्पना करता येत नाही म्हणून ती मूर्ती आपण स्थापीत असतो. परंतु परमेश्वराने स्वत:च्या अनंत मूर्ती निर्मिल्या आहेत. हे पाहा आकाशातील अनंत तारे ! हे तारे म्हणजे प्रभूच्या मूर्तीच आहेत. अंधारात चमकणारे, शांत, सुंदर तारे ! नियमितपणे उगवणारे, मावळणारे तारे ! आणि सुंदर चंद्र व तेजस्वी सूर्य म्हणजे प्रभूच्याच मूर्ती नाहीत का? आणि हे वडाचे प्रचंड झाड म्हणजे प्रभूचीच मूर्ती नाही का? हिरवी हिरवी झाडे पाहिली म्हणजे किती आनंद होतो ! या हिरव्या झाडांखाली कोणीही यावे. अस्पृश्याने यावे, हिंदूने यावे, मुसलमानाने यावे. पशुपक्षी, कोणीही यावे. आणि त्यांची फुले, फळे कोणीही घ्यावी. झाडे म्हणजे प्रभूची हिरवी मंदिरे असे मला वाटते. या हिरव्या मंदिरांत दंभ नाही. पैशांनी येणारी व्यसने नाहीत. श्रेष्ठ-कनिष्ठपणाचे खोटे भेद नाहीत. आणि तुमची ही गोदावरी? देवाची झुळझूळ वाहणारी ही करूणा ! ही परमेश्वराची खूण नाही का? जिकडे पहाल तिकडे प्रभूच्या मूर्ती ! आणि तुम्ही-आम्ही? आपण प्रेमाने एकमेकांस पाहतो, प्रणाम करतो, तेव्हा आपण देवच जणू असतो. आपल्या हृदयात तेव्हा प्रभू असतो. आपण जणू त्याचे मंदिर बनतो.
“बंधूंनो, कशाला त्या चार भिंतीच्या संकुचित मंदिरात जाता? हे पाहा विश्वमंदिर ! या विशाल आकाशाच्या खाली कोठेही बसावे, क्षणभर डोळे मिटावे आणि त्या जगच्चालकाला प्रणाम करावा. उत्साहित होऊन पुन्हा आपल्या कामाला लागावे. रामतीर्थ म्हणत असत, “मला जेव्हा थकवा वाटते, उदासीनपणा वाटतो, तेव्हा मी खोलीच्या बाहेर पडतो. मैदानात फिरायला जातो. मोकळा वारा अंगाला लागतो. विशाल अपार सृष्टीचे दर्शन होते. आणि पुन्हा मी ताजातवाना होतो.” हा उत्साह कोठून येतो? सृष्टीच्या स्पर्शाने ही स्फूर्ती येते. सृष्टी म्हणजेच प्रभूचे रूप. साधी फुले पाहा. किती गोड दिसतात ! एक मोठा कवी होऊन गेला. तो एके दिवशी सारखा विचार करीत होता. त्याचे एक मन म्हणे, “या जीवनात अर्थ नाही. कशाला जगतोस ! या जगात किती रोग, किती दु:खे ! आणि या जगाचे स्वरूप तरी कोणाला समजले आहे का? प्राणी कोठून येतो, कोठे जातो? सा-या आशा-आकांक्षांची एक दिवस चिमूटभर राख होते. तुम्हाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे खंडित रती. तुम्ही शोध लावता. त्यांचा मोठा गर्व मानता. परंतु किती अज्ञात विश्व पडले आहे. फुकट आहेत तुमचे खटाटोप. मालव तुझा दिवा. मरून जा.” त्याचे दुसरे मन म्हणते, “नको रे मरू. पाहा सृष्टी किती सुंदर आहे ! सृष्टीत विकास आहे. अरे, शेकडो, हजारो स्थित्यंतरांतून तू मनुष्यप्राण जन्मलास. प्रथम पशूसारखा तू होतास. पुढे सुधारणा केलीस. शेतीभाती केलीस. घरदार करून राहू लागलास. कुटुंबपध्दती आणलीस. आई-बाप, बहीण-भाऊ, पति-पत्नी अशी सुंदर नाती निर्माण केलीत. नीती निर्मिलीस. शास्त्रे शोधलीस. रस्ते बांधलेस. पूल बांधलेस. गलबते बांधलीस. ग्रंथ निर्मिलेस. छापखाने आले. आपले अनुभव पुस्तकरूपाने सर्वत्र जाऊ लागले. मानव चांगला होत आहे. अद्याप भांडणे आहेत. लढाया आहेत. द्वेषमत्सर आहेत. स्वार्थ आहे. दास्य आहे. पिळवणूक आहे. तरीपण मनुष्य सुधारत आहे. मानवांत अशी थोर माणसे झाली. दुसर्यासाठी झिजणारी. जगासाठी सुखावर निखारे ठेवणारे भगवान येशू ख्रिस्त ! सर्वांना समानता शिकविणारे ते भगवान महंमद पैगंबर ! थोर थोर माणसे. जगाला ज्ञान देताना विषाचा पेला पिणारे ते सॉक्रेटिस ! जगात शास्त्रीय ज्ञान यावे म्हणून हुतात्मे होणारे ते शास्त्रज्ञ आणि ते अनेक स्वातंत्र्यवीर ! आणि ते ! धर्मात्मे, प्रेमात्मे, किती संत, किती महर्षी ! मनुष्यप्राणी प्रयत्नाने किती उंच स्थिती प्राप्त करून घेतो ते अशा थोरांच्या जीवनावरुन समजते. थोर कवी बघ. थोर चित्रकार बघ. मोठे संगीतज्ञ बघ. महान शिल्पी बघ. कोणी रामायणे लिहिली; कोणी ताजमहाल बांधले; कोणी प्रचंड मंदिरे बांधली. कोणी सुंदर लेणी खोदली. हे जीवन सुंदर आहे. अधिकाधिक सुंदर होत आहे. अरे, केवळ मातेच्या प्रेमाचा अनुभव मिळावा म्हणून या जगात पुन:पुन्हा जन्मावे. आणि भावाबहिणींचे प्रेम, भावाभावांचे प्रेम, पतिपत्नी प्रेम, मित्रप्रेम अशी ही निरनिराळी मधुर मधुर प्रेमे ! यांना का अर्थ नाही? छे ! मरू नकोस. जग.”