उदय 7
“गुलामगिरी तुमच्या या दुष्ट धर्मामुळे आली. रूढींचा मुर्दाड धर्म. तुमचा सारा धर्मच गुलामगिरी पोसणारा झाला आहे. धर्माचा आत्मा कधीच मेला. पुरूषांची स्त्रियांवर गुलामगिरी, स्पृश्यांची अस्पृश्यांवर गुलामगिरी, श्रीमंतांची गरिबावर गुलामगिरी ! अशी ही विराट गुलामगिरी मला सर्वत्र दिसत आहे. या तुमच्या गुलामगिरीमुळे गरीब हिंदू मुसलमान होतात. या तुमच्या गुलामगिरीमुळे परकियांची सत्ता येथे राहते. या गुलामगिरीमुळे आपसांत मतभेद माजतात व पारतंत्र्य कायम राहते. धर्म ! कोठे आहे धर्म? माणुसकीला ओळखणारा, भावनांना ओळखणारा, दुसर्याच्या हृदयाची जाणीव ठेवणारा, अश्रूंची कदर करणारा, दु:खितांस सुखवू पाहणारा असा धर्म कोठे आहे? तुमच्या रूढ धर्मासच आज विवेक नाही. तुमच्याजवळ धर्म असता, तर अशा निष्पाप बालविधवांना तुम्ही रडत ठेवले नसतेत. त्यांची हृदये ओळखली असतीत. असला हृदयहीन धर्म नष्ट होईल, तेव्हा समाज स्वतंत्र होईल. सुखी होईल. यासाठी शतमुखी क्रांती हवी. तिच्याशिवाय तरणोपाय नाही.”
“येथून चालते व्हा. दुसर्यांच्या मुली अशाच भ्रष्ट करा. पापाचा धर्म करा.”
“तुमचे डोळे एक दिवस उघडतील. तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीला रडवलेत. तिला विषवल्ली म्हटलेत. तिला दूर लोटलेत. परंतु तुम्हांला पश्चात्ताप होईल. “सरले, सरले, मी चुकलो” असे म्हणत मराल. समजले? जातो मी. सरला नसेल तर माझाही संसार सरला ! मला इतिकर्तव्य राहिले नाही. ठीक, प्रणाम.” असे म्हणून उदय बाहेर पडला. त्याला घेरी येईल असे वाटले. तो जिन्यात जरा बसला. परंतु पुन्हा तो उठला. हळूहळू तो निघाला तो त्या कालव्यांकडे वळला. ती प्रेमधामे तो पाहायला निघाला. ते बाभळीचे झाड तेथे होते. आजूबाजूस हिरवी सृष्टी होती. गवतावर मुंगळे होते. त्याला सरलेच्या पदरावरचा मुंगळा आठवला. तो दगड तेथे होता. त्याच्या मनात एकदम काय आले कोणास कळे ! त्याने त्या दगडावर एकदम डोके आपटले. परंतु त्याच्याने पुन्हा आपटवेना. सरलेने डोके आपटले तेव्हा मी धावलो. आज सरला येते का धावून म्हणून त्याने सभोवती पाहिले. सरले, सरले अशा त्याने हाका मारल्या. खरेच का तिने जीव दिला असेल? हो, दिला असेल. कोठे जाणार, कोठे राहणार? कोण तिला आसरा देणार? अरेरे ! सरले, शेवटी असे व्हायचे होते तर तुझी-माझी गाठ तरी कशाला पडली? या सृष्टीत काही माणसांचे जन्म खरोखरच का केवळ दु:ख भोगण्यासाठी असतात? सरला किती सरळ मनाची, प्रेमळ हृदयाची ! कसे बोले, कशी हसे ! तुझ्या खाटेखालचा कचराही मला कस्तुरी आहे असे म्हणे. त्याला शत आठवणी आल्या. त्याने खिशातून तो रूमाल काढला. रात्रभर जागून त्यावरची ती वेल तिने गुंफली होती. त्याने त्या रूमालाने स्वत:चे अश्रू पुसले. जणू सरलेचे सुकुमार हातच अश्रू पुशीत आहेत असे त्याला वाटले. तो किती तरी वेळ तेथे बसला ! अंधार पडू लागला. शेवटी तो उठला. आणि विचार करीत करीत त्या खोलीवर आला.
“आलेत? झाले का काम?” त्या मुलाने विचारले.
“काम झाले. मी जातो सामान घेऊन.”
“कोठे मिळाली खोली?”
“मी परत जात आहे. पुणे सोडून जात आहे.”
“आलेत का? चाललेत का?”
“कामासाठी आलो; काम झाले; चाललो.”
“तुम्ही दु:खीकष्टी दिसता.”
“सुखासाठी दु:खाची किंमत द्यावी लागते.”
“तुम्ही निराश दिसता.”
“या जगात आशेने जगणारा क्वचितच कोणी असेल !”
“आशा नसती तर कोटयवधी माणसे कशी जगती? सारे जग आशेवर जगत आहे. आशा जगाचा प्राण आहे. उद्याची आशा ठेवून मनुष्य आजचे दु:ख सहन करतो. उद्याची आशा ठेवून आम्ही अभ्यास करतो. उद्याच्या आशेने व्यापारी व्यापार करतात. शेतकरी पेरतात. क्रांती करू पाहणारे क्रांती करतात. तुमच्या मनातही आशा असेल. प्राण्याच्या प्रत्येक श्वासोश्वासात आशेचे थोडे तरी मिश्रण असते.”
“मी तुम्हांला निराश नाही दिसत?”