Get it on Google Play
Download on the App Store

प्रेमाची सृष्टी 12

तिची अधिक चौकशी कोणी केली नाही. विश्वासरावांनी रमाबाईस “ताप वगैरे नाही ना तिला आला?” एवढेच विचारले. पुष्कळ वेळाने सरला उठली. तिने कागद घेतला. ती पत्र लिहू लागली :

“प्रियतमा,

तू अद्याप माझा प्रियतमच आहेस. आणि पुढेही प्रियतमच राहशील. मी माझे प्रेम कोणाला दिले नव्हते. माझा पती-त्याची माझी नीट ओळखही झाली नव्हती. तुला मी मनाने वरले. माझी प्रेमपुष्पे तुला वाहिली. तुझ्या पायांवर जीवन वाहिले. तू मला दूर लोटीस आहेस. तुझी इच्छा ! तुला मी कशी विसरू? तू माझा प्राण आहेस, माझे हृदय आहेस. रात्रंदिवस मी तुला स्मरते, तुला आळविते. तू मला विसर. तुला ते सहज शक्य वाटत असेल. तुझ्या हृदयात प्रेमाच्या रोपटयाचा प्रचंड वृक्ष नसेल झाला, त्याची मुळे फार खोल नसतील गेली, तर तू टाक उपटून. परंतु माझ्या हृदयात आता रोपटे नाही. प्रचंड वटवृक्ष झाला आहे. त्याची मुळे खोल हृदयपाताळाला जाऊन पोहोचली आहेत. हे झाड उपटणे म्हणजे जीवन उपटणे होय, हृदय उपटणे होय.

उदय. काय हे लिहिलेस? स्त्रीहृदयाची अशी प्रतारणा, अशी वंचना, अशी निराशा, अशी उपेक्षा का रे करतोस? जगात खरेच का कशाला अर्थ नाही? सारा का पोरखेळ? सारा का गारूडयांचा मायावी खेळ? सारे विश्व वाळूवर का उभारलेले आहे? सत्य म्हणून काही नाहीच का? श्रध्दा, निष्ठा म्हणून काही नाहीच का? कशातच का राम नाही? सतींचे अश्रू, हुतात्म्यांचे रक्त यांत का अर्थ नाही? हे वारे का उगीच वाहतात? हे तारे का उगीच चमकतात? हे पर्वत अभंगपणे का उभे आहेत? हे समुद्र का उचंबळतात? नद्या का वाहतात?  ही फुले का फुलतात? हे वृक्ष का बोलतात? हे सारे का नि:सार आहे? आपले डोळे एकमेकांकडे बघत व हसत. त्यात का काही अर्थ नाही? तुझे स्मरण होताच अक्षरश: माझे हृदय जणू नाचू लागते. एकदम काही तरी अपूर्व वाटते. ते का खोटे?

उदय, तू आज प्रखर प्रहार केला आहेस. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यानेच दूर लोटावे यासारखे दु:ख नाही. मी आता कोठे माणसांत येत होते. परंतु पुन्हा तू मला अंधारात लोटीत आहेस. लोट. परंतु मी कोठेही गेल्ये, कोठेही असल्ये तरी तुझी स्मृती, तुझी मूर्ती माझ्याजवळ राहील. मी तुला विसरू शकणार नाही. तू म्हणतोस, “मला विसर.” तुला विसरण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे मरणे. मरणानंतर जर काहीच नसेल, सारी चिमूटभर राख हीच जर सत्यता असेल, तर मरणाने मी तुला विसरू शकेन. परंतु मरणानंतरही जर जीवन असेल, तर तेथेही तुझी स्मृती माझ्याजवळच राहील. त्या मातीतही तुला मी स्मरेन.

माझ्या जीवनात रंग येत होता. सुगंध भरत होता. संगीत येत होते. आशा येत होती. आनंद येत होता. परंतु सारे अकस्मात तू नाहीसे करीत आहेस. अरेरे !

उदय, त्या दिवशी माझे डोके तू कशाला धरलेस? अत्यंत निराशेच्या दगडावर जर तू पुन्हा ते आपटणार होतास, तर त्याच वेळेस का नाही आपटलेस? आणखी थोडी आशा दाखवून, आणि त्या आशेचा भंग करून, हे अधिक दु:सह दु:ख देऊन ते डोके तू फोडू पाहात होतास वाटते?

प्रियतमा, तुझ्या हातून मला प्रेम नसेल मिळायचे तर मरण तरी दे. तुझ्याकडून मला आनंद नसेल मिळायचा तर दु:ख तरी दे. अशीच कठोर पत्रे लिही. माझा अपमान कर. परंतु विसरू नकोस. विस्मृतीशिवाय मला वाटेल ते दे. मी ते गोड मानीन. मी तुझ्याकडे येईन. विषाचा पेला भरून दे. मरण दे. तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मरण आहे. तुला का हे कळत नाही?

आज माझा देव मेला, धर्म मेला. श्रध्दा मेली, निष्ठा मेली ! सारा ध्येयवाद संपला. जीवन म्हणजे महान वंचना ! जीवन म्हणजे केवळ फार्स ! हे महान सत्य आज तू मला शिकवीत आहेस. नि:सारतेचे तत्त्वज्ञान तू मला आज शिकवीत आहेस.

रामाचा शेला

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
अभागिनी 1 अभागिनी 2 अभागिनी 3 अभागिनी 4 अभागिनी 5 अभागिनी 6 अभागिनी 7 अभागिनी 8 बाळ, तू मोठा हो 1 बाळ, तू मोठा हो 2 बाळ, तू मोठा हो 3 बाळ, तू मोठा हो 4 बाळ, तू मोठा हो 5 बाळ, तू मोठा हो 6 बाळ, तू मोठा हो 7 बाळ, तू मोठा हो 8 बाळ, तू मोठा हो 9 बाळ, तू मोठा हो 10 प्रेमाची सृष्टी 1 प्रेमाची सृष्टी 2 प्रेमाची सृष्टी 3 प्रेमाची सृष्टी 4 प्रेमाची सृष्टी 5 प्रेमाची सृष्टी 6 प्रेमाची सृष्टी 7 प्रेमाची सृष्टी 8 प्रेमाची सृष्टी 9 प्रेमाची सृष्टी 10 प्रेमाची सृष्टी 11 प्रेमाची सृष्टी 12 प्रेमाची सृष्टी 13 प्रेमाची सृष्टी 14 प्रेमाची सृष्टी 15 प्रेमाची सृष्टी 16 प्रेमाची सृष्टी 17 प्रेमाची सृष्टी 18 प्रेमाची सृष्टी 19 प्रेमाची सृष्टी 20 प्रेमाची सृष्टी 21 प्रेमाची सृष्टी 22 प्रेमाची सृष्टी 23 प्रेमाची सृष्टी 24 आई गेली 1 आई गेली 2 आई गेली 3 आई गेली 4 आई गेली 5 आई गेली 6 आई गेली 7 आई गेली 8 आई गेली 9 आई गेली 10 आई गेली 11 आई गेली 12 आई गेली 13 पंढरपूर 1 पंढरपूर 2 पंढरपूर 3 पंढरपूर 4 पंढरपूर 5 पंढरपूर 6 पंढरपूर 7 पंढरपूर 8 पंढरपूर 9 पंढरपूर 10 पंढरपूर 11 पंढरपूर 12 आशा-निराशा 1 आशा-निराशा 2 आशा-निराशा 3 आशा-निराशा 4 आशा-निराशा 5 आशा-निराशा 6 आशा-निराशा 7 आशा-निराशा 8 आशा-निराशा 9 आशा-निराशा 10 आशा-निराशा 11 आशा-निराशा 12 आशा-निराशा 13 आशा-निराशा 14 आशा-निराशा 15 आशा-निराशा 16 आशा-निराशा 17 आशा-निराशा 18 कुंटणखाना 1 कुंटणखाना 2 कुंटणखाना 3 कुंटणखाना 4 कुंटणखाना 5 कुंटणखाना 6 कुंटणखाना 7 कुंटणखाना 8 कुंटणखाना 9 कुंटणखाना 10 उदय 1 उदय 2 उदय 3 उदय 4 उदय 5 उदय 6 उदय 7 उदय 8 उदय 9 उदय 10 उदय 11 गब्बूशेट 1 गब्बूशेट 2 गब्बूशेट 3 गब्बूशेट 4 गब्बूशेट 5 गब्बूशेट 6 गब्बूशेट 7 गब्बूशेट 8 आजोबा नातू 1 आजोबा नातू 2 आजोबा नातू 3 आजोबा नातू 4 आजोबा नातू 5 आजोबा नातू 6 आजोबा नातू 7 आजोबा नातू 8 आजोबा नातू 9 आजोबा नातू 10 आजोबा नातू 11 आजोबा नातू 12 आजोबा नातू 13 सनातनींची सभा 1 सनातनींची सभा 2 सनातनींची सभा 3 सनातनींची सभा 4 सनातनींची सभा 5 सनातनींची सभा 6 सनातनींची सभा 7 सनातनींची सभा 8 सनातनींची सभा 9 सनातनींची सभा 10 सनातनींची सभा 11 सनातनींची सभा 12 सनातनींची सभा 13 सनातनींची सभा 14 सनातनींची सभा 15 सनातनींची सभा 16 भेट 1 भेट 2 भेट 3 भेट 4 भेट 5 भेट 6 भेट 7 भेट 8 भेट 9 भेट 10 भेट 11 भेट 12 भेट 13 *समारोप 1 *समारोप 2 *समारोप 3 *समारोप 4 *समारोप 5 *समारोप 6