प्रेमाची सृष्टी 11
परंतु एकदा चमत्कारिक प्रसंग आला. उदय त्या दिवशी विषण्ण होता. त्या दिवशी तो जेवला नाही, एकटाच फिरायला गेला होता, टेकडीवर एकटाच बसला होता. अंधार पडला. त्याला पर्वा नव्हती. किती वाजले, किती वेळ गेला, त्याला भान नव्हते. आता चंद्रही उगवला. तो पहा चंद्र. चंद्र वर वर येत आहे. परंतु ते पहा ढग त्याला घेरीत आहेत. उदय चंद्राकडे पाहात आहे. तो पाहा चंद्र मेघांमधून पुन्हा वर आला. पुन्हा बाहेर आला. परंतु ढग त्याचा पिच्छा सोडीत नव्हते. ढगांवर ढग आले. काळेकभिन्न ढग. चंद्र पुन्हा लोपला. त्याचा पत्ता नाही. परंतु काही वेळाने चंद्र थोडा दिसू लागला. क्षणात पुन्हा घेरला गेला. उदय निरखीत होता, जीवन का असेच आहे? काय आहे या जीवनात अर्थ? आशा-निराशा, सुख-दु:ख, यशापयश यांचे चिरंजीव झगडे ! अंधार व प्रकाश यांचे अखंड युध्द ! कसले प्रेम नि कसले काय? दिव्याखाली अंधार आहे, फुलात कीड आहे. चंद्राला डाग आहेत, जीवनाच्या पोटी सरण आहे, प्रेमात मत्सर आहे. काय आहे हे सारे? सृष्टीचे रहस्य काय? विरोध की विकास? विकासाकडे दृष्टी द्यायची की विरोधाकडे? विकास पाहावा तर विरोध आ पसरून उभा असतो. विरोधाकडे पाहावे तर तिकडे विकासाचा प्रकाश दिसतो. काटे पाहावे की वरचा गुलाब पाहावा? उदय गंभीर झाला, खिन्न झाला, नको कोणाशी संबंध असे त्याला वाटले. उद्या पुन्हा ताटातुटी झाल्या तर रडारड पदरी यायची. त्यापेक्षा एकटे असणेच बरे. नको सरला । नको कोणी !
तो टेकडीवरुन निघाला. अंधार होता. चंद्र मेघांत बुडून गेला होता. एके ठिकाणी उदयचा पाय घसरला. तो पडला. पुन्हा उठला. त्याचे लक्ष नव्हते. पायाला लागले की काय ते त्याने पाहिले नाही. एकदाचा तो आपल्या खोलीत आला त्याने सरलेला एक पत्र लिहिले :
“सरले,”
आपण प्रेमाचा खेळ संपवू ये. प्रेम अद्याप जिवंत आहे. तोच ते विसरू ये. भविष्यात काय आहे कुणास ठाऊक? उगीच तुझी माझी ओळख झाली. मी एकाकी होतो तोच बरा होतो. तू माझे प्रेम विसरून जा. जीवन हे नि:सार आहे. कशात अर्थ नाही. आपण एकमेकांपासून दूर राहणेच बरे. अद्याप मुळे फार खोल गेली नाहीत तोच हे रोपटे उपटून टाकू ये. आपण कठोर व्हायला शिकले पाहिजे. प्रेमबीम, कशाला अर्थ नाही. सारे पोकळ, फसविणारे, अंती रडविणारे आहे. वरची हिरवळ आपण पाहतो. परंतु खाली खळगे आहेत त्यांत पडू व रडू त्यापेक्षा सावध होणे बरे. तू मला विसरून जा. एक स्वप्न समज.
-- उदय.”
महिला महाविद्यालयाच्या पत्त्यावर त्याने ते पत्र पाठविले. सरलेने ते पत्र घेतले. ते तिने फोडले नाही. तास संपले. ती निघाली. घरी आली. ते पत्र हातात घेऊन बसली. तिने अक्षर ओळखले. परंतु उदयने आतापर्यंत पोस्टाने पत्र पाठवले नव्हते. आज का बरे पोस्टाने पाठवले? शेवटी ते पत्र तिने फोडले. तिने वाचले. तिच्या हृदयाला धक्का बसला. तिचे डोळे घळघळू लागले. तिला काय करावे समजेना. ती अंथरूणात पडून राहिली. रडणार तरी किती? तिचे डोळे का रडण्यासाठीच होते? ती एकच शब्द उच्चारी. अरेरे ! अरेरे, हा एकच शब्द ती उच्चारी. त्या एका शब्दात तिच्या अनंत वेदना होत्या.
“सरले, जेवायचे नाही का?” रमाबाईंनी येऊन विचारले.
“नको जेवायला. कपाळ दुखत आहे.” ती म्हणाली.