पंढरपूर 6
“उदय, का रे डोळयांत पाणी?” असे मी विचारले.
“आपले हे सुख राहील का असा मनात विचार आला. खरेच का सारा असार पसारा आहे? हे जग, ही दुनिया, हा संसार म्हणजे का शून्य? मग त्या प्रभुराजाने हे सारे निर्माण तरी कशाला केले? सरले, अशी दिवाळी पुन्हा येईल की नाही? आजचे हे निरभ्र, निर्मळ, अपरंपार प्रेम ! हे टिकेल का? का ताटातुटी होतील? अश्रू कपाळी असतील? का आपणच एकमेकांस विटू, कंटाळू?” असे उदय त्या वेळेस बोलला.
“उदय, सुखाच्या वेळेस कशाला काल्पनिक दु:खाच्या छाया? पूस डोळे नि हस. हा क्षण तरी आनंदाचा असो. या आजच्या पेल्यात तरी दु:ख नको मिसळू, आणि उद्या असलेच दु:ख नशिबी, तर तेही गोड करू. उदय, प्रेमाचे दु:ख ही सुध्दा एक अमोल वस्तू आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याच्यासाठी हुरहूर वाटणे, त्याच्यासाठी डोळे भरून येणे, हृदय खालीवर होणे, ही एक थोर भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्यासाठी आपण रडू असे कोणी असले म्हणजे झाले. प्रेम सुख देवो वा दु:ख, जीवन देवो वा मरण. ते सारे गोडच आहे. खरे ना? ऐक. मी दुसरी एक प्लेट लावते.” असे मी म्हटले. आणि उदय हसला.
“किती छान तू बोलतेस ! त्या प्लेटी बंद कर. तूच प्रेमाचे उपनिषद गा.” असे तो म्हणाला.
सरलेला किती आठवणी येत होत्या. परंतु तिच्या पाठीमागे कोण उभे होते?
“सरले, काय करतेस?”
“बसले आहे विचार करीत.”
“झोप. नाही तर पुन्हा ताप येईल.”
“बाबा, तुमचे माझ्यावर प्रेम आहे का?”
“प्रेमबीम मला समजत नाही.”
“मग मी मेल्ये तरी चालेल?”
“मला जास्त बोलता येत नाही. जा नीज.”
ती खाली गेली. खोलीत बसली. विश्वासराव पुन्हा आपल्या खोलीत गेले.
सरलेच्या मनात वडिलांना सारे सांगावे असे किती किती आले. परंतु वडिलांच्या सहानुभूतिशून्य उत्तरामुळे तिने शेवटी काही सांगितले नाही. आणि आता ती उठली. तिच्याजवळ काही पैसे होते. पहाट होत आली होती. पारिजातकाच्या फुलांचा वास येत होता. अद्याप त्यांना बहर नव्हता. थोडी फुले होती. तिने वळकटी घेतली. आपला तांब्या घेतला. ती निघाली. देवाचे स्मरण करीत निघाली.
एक टांगा करून ती स्टेशनवर आली. स्टेशनवर फार वेळ राहायला लागू नये अशी तिची इच्छा होती. बाबा एखादे वेळेस शोधीत यायचे. बाबांना काहीच निरोप मी ठेविला नाही. लिहू का त्यांना चार ओळी? नको, नकोच हा विचार. त्यांना कोठे एवढे प्रेम आहे? ते माझा विचारही करणार नाहीत आणि शोधाच्या यातायातीत पडणार नाहीत.