सनातनींची सभा 11
“येऊ द्या त्यांना. धर्म सर्वांना जवळ घेतो. येऊ द्या. येथे माझ्याजवळ त्यांना घेऊन या. येथे खुर्चीत त्या बसतील. म्हणजे गोंधळ होणार नाही.”
अध्यक्षांनीच सांगितले तेव्हा कोण विरोध करणार? कोणी रागावले. कोणी “हा अधर्म आहे” असे म्हटले. अहो, शेटजींचीच कोणी असेल, असे हळूच कोणी म्हणाले. स्वयंसेवक सरलेला घेऊन आले. त्या सौंदर्यमूर्तीकडे सर्वांचे डोळे लागले. स्त्री-पुरूष सर्वांची दृष्टी त्या मुखचंद्राकडे होती. सरला जवळ येताच शेटजी उभे राहिले.
“हया खुर्चीत बसा.” ते म्हणाले.
“आपली आभारी आहे.” असे म्हणून प्रणाम करून सरला बसली.
स्वागताध्यक्ष गारठूनच गेले. त्यांनी सनातनधर्माचे महिम्नस्तोत्र लवकर आटोपते घेतले. शेवटी म्हणाले, “असे हे नाशिक क्षेत्र. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पवित्र झालेले. येथे का धर्म रसातळाला जावा? आर्यांच्या यज्ञधर्माचा उच्छेद करू पाहणार्या असुरांचा प्रभू रामचंद्रांनी येथे संहार केला. आम्हीही धर्माचा नाश करू पाहणार्यांस क्षमा करणार नाही. आम्ही सारे सहन करू; परंतु धर्मावर कोणी आघात केला तर तो आम्ही सहन करणार नाही. आपण आपला निर्धार उद्धोषिला पाहिजे. थोर अध्यक्ष लाभले आहेत. ते सकलगुणमंडित आहेत. संपत्तीने कुबेर आहेत. विद्वत्तेने बृहस्पती आहेत. सरकारदरबारी त्यांची प्रतिष्ठा आहे. त्यांच्या निर्दोष नेतृत्वाखाली आपण धर्मपरित्रार्णार्थ संघटित होऊ या. सनातनधर्माचा आत्मा निष्कलंक राखू.”
अध्यक्षांच्या गुणवर्णनपर आणखीही काही भाषणे झाली. रामाचे सुप्रसिध्द पुजारी वेदमूर्ती रामभटजी यांचेही संस्कृतप्रचुर भाषण झाले. अध्यक्ष स्थानापन्न होऊन भाषणासाठी उभे राहिले. सर्वत्र शांतता होती. त्यांचे भाषण ऐकण्यास सारे उत्सुक होते.
“धर्मप्रिय बंधु-भगिनींनो,
हा एवढा समाज धर्माच्या प्रेमाने उपस्थित झालेला पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. माझे भाषण तुम्हांस ऐकावयाचे आहे. परंतु त्याच्याआधी माझी एक प्रार्थना आहे. या सरलाबाई येथे आल्या आहेत. रामरायाची त्यांच्यावर कृपा आहे. ज्याच्यावर प्रभुकृपा झाली त्याहून थोर कोण? सरलाबाईंना थोडे बोलावयाचे आहे. त्यांना लौकर जावयाचे आहे. म्हणून माझ्या आधी त्या बोलतील. त्यांचे भाषण झाल्यावर मी माझे अध्यक्षीय भाषण करीन. तुम्ही सनातन धर्मास शोभेशा शांततेने त्यांचे भाषण ऐकून घ्याल अशी आशा आहे.” आणि सरला उभी राहिली. तिच्या अंगावर तो शेला झळकत होता. जणू देवता येऊन उभी आहे असे तिला वाटत होते आणि मंडपाबाहेरही आता खूप गर्दी झाली. अ-सनातनींची ती गर्दी होती. तरूणांची गर्दी होती. उदार भावनांचा, त्यागाचा धर्म पाळणार्या परंतु रूढीचा धर्म भिरकावणार्या तरूणांचे जथेच्या जथे लोटत होते. सरलेने एकवार सर्वत्र पाहिले आणि ती त्या ध्वनिक्षेपकासमोर उभी राहिली. तिचे भाषण सुरू झाले: