गब्बूशेट 8
“तो बंदोबस्त आहे. खोलीला कुलूप असते. जरूरीपुरते बाहेर जाते.”
“परंतु पाखरू जिवंत राहिले पाहिजे.”
“जिवंत राहील. तिची आयुष्यरेषा मोठी आहे.”
“तुम्ही जवळ घेऊन हात कधी पाहिलात?”
“दुरूनच रेषा दिसली.”
“बरीच सूक्ष्म दृष्टी आहे तुमची !”
“ही रामरायाची कृपा. तुम्ही उद्या जाणार म्हणता?”
“राहिलो तर कळवीनच. अच्छा, जयगोपाळ.”
“जयगोपाळ.”
रामभटजींना पोचवायला मोटार गेली. शेटजी पलंगावर पहुडले. सुंदर मच्छरदाणी वार्याने हलत होती. शेटजींचे मन डोलत होते. मध्येच त्यांना हसू येई. जणू गुदगुल्या होत. परंतु सरला तिकडे रडत होती. प्रभूचा धावा करीत होती. उदयला आठवीत होती. शेटजी, आज तुम्ही हसा; उद्या तुम्ही रडाल. सरले, आज तू रड; उद्या तू हसशील.