आजोबा नातू 9
गाडीत एक भटजी भेटला. पंढरपूरच्या बडव्यांपैकीच तो होता. त्याच्याकडे ते उतरले. त्यांनी चंद्रभागेचे स्नान केले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. देवाला नैवेद्य केला. ते भटजीस म्हणाले, “आता पाहण्यासारखे काय?”
“सारे झाले पाहून. गोपाळपुराही पाहिला. जनाबाईंची वाकळ पाहिली. आता काही राहिले नाही.”
“येथे एक अनाथ स्त्रियांची संस्था आहे ना?”
“तेथे कशाला जाता? तेथे काय पाहण्यासारखे आहे?”
“यावे जाऊन. ती संस्था खरे धर्मकार्य करीत आहे. अनाथ मुलांना वाढवीत आहे. परित्यक्त व अगतिक भगिनींना आधार देत आहे. हे देवाचे कार्य आहे. ती संस्था पाहिली पाहिजे. पंढरपूरला येऊन ती संस्था न पाहणे म्हणजे पाप आहे. माझ्या मते पतितपावन पांडुरंग जर खरोखर कोठे असेल तर तो तेथे आहे.”
“तुम्ही या जाऊन. मी तेथे येणार नाही. तुम्हांला एक टांगा करून देतो.” भटजींनी एक टांगा करून आणला.
“यांना ती बायकांची संस्था दाखवून परत येथे घेऊन ये. तेथे जरा थांबावे लागले तरी थांब.” असे त्यांनी टांगेवाल्यास सांगितले. विश्वासराव टांग्यात बसून गेले. ती संस्था आली. ते कचेरीत गेले. व्यवस्थापक तेथे होते. कुशल प्रश्नोत्तरे झाली. व्यवस्थापकांनी संस्थेची माहिती दिली. नवीन वर्षाचा अहवाल दिला.
“जरा हिंडून दाखवा सारे.”
“हो, चला. मुलांची व्यवस्था ठेवावी लागते. मोठे काम. पैसे हवेत. अनाथ मुले. ही कशी नीट वाढणार? यांचे उद्या शिक्षण कसे होणार? ज्यांची मने मोठी आहेत त्यांनी एखादे मूल आपल्या घरी न्यावे. त्याला प्रेमाने वाढवावे. तो खरा धर्म आहे. नाही का?”
बोलत बोलत व्यवस्थापकांबरोबर विश्वासराव हिंडत होते. तेथे त्या परित्यक्ता माता होत्या. कोणी रडत होत्या, कोणी उदासपणे पडून होत्या. आणि विश्वासरावांनी ती मुले पाहिली. देवाची लेकरे ! मुले पाहता पाहता एका मुलावर त्यांची दृष्टी खिळली. लहान मूल. असेल सहा-सात महिन्यांचे.
“किती गोजिरवाणे मूल !” ते म्हणाले.
“त्याची आई खरेच सुंदर होती. एके दिवशी एकटीच संस्थेत आली. बरोबर कोणी नाही. एक लहानशी वळकटी व हातकडीचा तांब्या.”
“तिचे नाव सरला होते का?”
“तुम्हांला काय माहीत?”
“परंतु सरलाच होते ना?”