प्रेमाची सृष्टी 2
“आणि तुमचे नाव उदय ! तुमच्या रुमालाने मला सांगितले. किती सुंदर नाव ! उदय? अंधारात उगवलेला तारा; अंधारात उगवलेला चंद्र. अंधारात उदयास येणारा सूर्यनारायण, उदय ! खरेच किती सुंदर नाव ! मी त्या नावाचा जप करीत असते. “उदय, माझ्या जीवनात कर ना रे तुझा उदय. येशील का माझ्या जीवनात? तू असशील का उदार, दिलदार; प्रेमळ, स्नेहाळ?” असे मी त्याला विचारीत असते.”
"तो काय म्हणे? काय उत्तर देई?”
“करीन उदय, करीन अंधार, देईन प्रकाश, देईन प्रेम, असे तो म्हणे.”
“कपाळावरची जखम बरी झाली का?”
“सार्या जखमा बर्या झाल्या. आतल्या, बाहेरच्या. माझे कपाळ फुटकेच होते. ते आणखी फोडायचे ते काय राहिले होते. फुटके कपाळ पुन्हा मंगल होईल, सुंदर होईल.”
“कपाळाला काय लागले म्हणून घरात कोणी विचारले नाही?”
“बाबांनी एकदा विचारले. मी म्हटले की पर्वती चढताना पाय घसरला, लागले.”
“मी या बाजूला दोनतीनदा येऊन गेलो.”
“मी जरा आजारी होते. ताप आला होता.”
“मला वाटलेच !”
“परंतु त्या आजारीपणात आनंद वाटत होता. त्या आजारीपणातच तुमच्या नावाचा शोध लागला. तो रक्तसुंदर रुमाल मी हातांत खेळवीत असे. आणि सहज पाहात होते. तो सापडले नाव. ते नाव वाचताच मी आनंदले. एकदम तो रुमाल हृदयाशी धरला. तोंडावरून फिरवला. त्या आजारीपणात त्या रुमालाशी मी बोलत बसे. “सांग रे त्यांच्या गोष्टी” असे मी त्याला म्हणे.”
“तो रूमाल सांगे का?”
“हो. किती किती सांगे. रामायण, महाभारत सांगे. त्यांच्या मुक्या कथा ऐकता ऐकता मी कधी हसे; कधी रडे. कधी भावनांनी थरथरू लागे. एके दिवशी सायंकाळी मी उठले. बाबांच्या बागेतील फुले मी कधी तोडीत नाही; परंतु त्या दिवशी तोडली. रात्री तो रूमाल माझ्या उशीवर ठेवून त्याची मी पूजा केली. अश्रूंचे अर्ध्य दिले. प्रेमाचे निरांजन ओवाळले. आणि ती फुले माझ्या केसांत मी घातली. देवाचा प्रसाद म्हणून आजारीपण ते शरीराचे आजारीपण होते. परंतु मनाचे बरेपण होते. मनाच्या वेदना नाहीशा होत होत्या. हृदयाच्या कळा बंद होत होत्या. निराशेचा अंधार नाहीसा होत होता. मंगल प्रकाश जीवनात येत होता. लहानसा रूमाल ! माझे सारे जीवन झाडून पुसून त्याने लख्ख केले, सुंदर केले.”
कोठे आहे तो रुमाल?”
“दाखवू? हा बघा.”
तिने खिशातून तो रुमाल काढला. त्याच्यावर सुंदर वेल काढलेली होती. वेलीवर दोन पाखरे होती.
“माझ्या रुमालावर वेल नव्हती, पाखरे नव्हती.”
“परंतु आता फुलली वेल, आली पाखरे ! तुमच्या हृदयात नाही का फुलली वेल? माझ्या तर फुलली आहे. तेथे पाखरे नाचत आहेत, गात आहेत. भुंगे गूं गूं करीत आहेत. माझ्या हृदयातील वेल या रुमालावर मी गुंफली. हृदयातील पाखरे येथे गुंफली. परंतु हृदयातील सारे येथे गुंफता येईना.”