बाळ, तू मोठा हो 2
“उदय, बाबू पाहुणा आला आहे. तरी तो स्वयंपाक करतो. मी सांगेन त्याप्रमाणे करतो. तो तरी का मोठा आहे? तुझ्याच वयाचा. चूल पेटवतो. सारे करतो. धुराजवळ बसतो, तुला एवढे वाढणेसुध्दा का होत नाही? असे का करावे?
“तो दिवसभर तर घरी असतो. मी शाळेतून येतो. दमून येतो. पुन्हा हे घरी काम.”
“शाळेत दमायला रे काय झाले? तेथे का गोण्या उचलायच्या असतात? ऊठ. वाढ सर्वांना आजचा दिवस. उद्या आम्ही अंगे धुऊ. जा बाळ. घे पाने.”
त्या दिवशी उदयने आदळआपट करीत सर्वांना वाढले आणि मागून एकटा जेवायला बसला. उदयला जेवताना साखर घ्यायची सवय होती. परंतु आज घ्यायला तो विसरला. बाबू जवळच होता. उदय इंग्रजी शाळेत जाऊ लागला होता. काही शब्द पाठ झाले होते. बाबू अजून मराठी शाळेतच होता. तो बाबूला म्हणाला, “बाबू, शुगर.”
“काय म्हणालास?”
“शुगर, शुगर.”
“शिव्या देतोस का रे”
“शुगर, यू शुगर.”
“शिव्या थांबवतोस की नाही?”
उदय शुगर शुगर करीत ओरडत होता. बाबूही संतापला. दोघी आया घरात आल्या.
“अरे, आहे काय? काय हा आरडाओरडा?”
“उदयच्या आई, उदय सारख्या शिव्या देत आहे.”
“काय रे उदय?”
“मी नुसते शुगर शुगर म्हटले.”
“म्हणजे रे काय?”
“म्हणजे साखर. मी त्याच्याजवळ साखर मागत होतो. ही का शिवी?”
“परंतु चांगले मराठीत मागायला काय झाले? घरात रे कशाला इंग्रजी? उद्या मोठा हो व साहेबाजवळ फर्डे बोल. बाबू, ती शिवी नव्हती हो. उदय चावट आहे. आटप जेवण. किती वेळ जेवतो आहे.” उदय हसत होता. बाबू धुसमुसत निघून गेला.
उदयचे ते पोलिसखात्यातील मामा जेव्हा जेव्हा येत, तेव्हा तेव्हा नेहमी म्हणायचे, “उदय, इंग्रजी चांगले बोलायला शीक. अक्षर चांगले कर. मग तुला देईन मोठी नोकरी. पोलिसखात्यात तुला मोठा हुद्दा मिळेल. समजलास ना?”