आई गेली 3
“तुमच्या उदयचे सुध्दा लग्न करायला हवे. सूनमुख पाहा. नातू मांडीवर खेळवा. सुखाचे दिवस पाहा. मग डोळे मिटा. तोवर जगा. उगीच वेडेवाकडे मनात आणीत नका जाऊ. समजलात ना? काही लागले-सरवले कळवीत जा. थोडा मुरावळा पाठवू का?
“काही नको. राम राम म्हणत पडून राहीन. औषधं जान्हवीतोयं वैद्यो नारायणो हरि: दुसरे आता काही नको. नाशिकला असत्ये तर गंगातीरी मरण आले असते. परंतु नाही नशिबी.”
मालकीणबाई निघून गेल्या. द्वारकाबाईना खूप शीण वाटला. डोळे मिळून त्या पडून राहिल्या.
रात्री त्यांना एकाएकी वात आला.
“उदय, येरे लवकर. अरे बाहेर ऊन आहे. छत्री घ्यावी. आईचे ऐकावे बाळ. झाली ना परीक्षा. ये आता. आता आईला मांडी द्यायला ये. भाऊ बघ उदय आला. असा दु:खी का तो? त्याला कसले वाईट वाटते आहे? उदय, मी तुला सोडून जाणार म्हणून का रडतो आहेस? अरे देव सर्वांना आहे. ये. बस जवळ. वाळलास हो. परीक्षेचा त्रास. जागरणे केली असशील? ये, बस जवळ. भाऊ आण रे त्याला जवळ. नाही येत? गेला, कोठे गेला? कोणी नेले त्याला ओढून? आईच्यापेक्षा त्याच्यावर कोणाचा हक्क? भाऊ, जा रे त्याला आण. कोण नेत असेल त्याच्या हातून त्याला सोडवून आण. आपल्याला नली नको. श्रीमंताची मुलगी नको. तुला का नली हवी आहे? तिला तुझे डोळे आवडतात. परंतु तिचे लग्न ठरले राजा. आपण गरीब आहोत. हसला. भाऊ, तो बघ हसला. लग्नाची गोष्ट काढताच बघा गुलाम हसला. आईला कंटाळलास का रे? आणू हो नवी नवरी. सूनमुख पाहीन. तुझे वडील असते तर ! असे नसते हो हाल झाले ! मला नाही हो तुला सुखात ठेवता आले.
भाऊ, अरे, उदय बुडतो आहे. त्या बघ लाटा. अरे, त्याला वाचव. तो बघ पूर वाढतो आहे. लोंढा येत आहे. पोहता येत नाही. कशाला उडी घेतलीस? अरेरे ! वाचवा रे कोणी.
उदय, वाचलास? ये.ये. असा कोठे उडी नको घेऊस. जपून रहा राजा. आईची तू आशा. खरे ना?”
असे ती माउली कितीतरी सारखे वातात बोलत होती. भाऊ जवळ बसून होता. एखादे वेळेस ती माता एकदम उठू पाही. भाऊ तिला आवरी. रात्र संपत आली. पहाटेचा थंड वारा आला. द्वारकाबाई थकल्या. त्यांना का झोप लागली? आणि आता उजाडले.
“भाऊ.”
“काय ताई? काय हवे?”
“काही नको. उदय आला का?”
“आज येईल.”
“तार केलीस का?”
“नाही.”
“तार कर रे. होऊ दे रूपया खर्च. एवढे माझे प्राण जाणार आहेत तेथे रूपयाचे काय घेऊन बसलास? आज तार कर. भरपूर पैशांची मोठी तार कर.”