आजोबा नातू 6
“नको. पुन्हा जागा व्हायचा. रडू लागायचा. मी येथे बसतो. येथेच पांघरूणात निजू दे. तू जा. जरा पड.”
“का हो, बाळ अगदी शांत दिसतो आहे नाही? त्याची छाती वरखाली का बरे नाही होत? जरा बघा ना वाकून.”
विश्वासरावांनी खाली वाकून पाहिले. श्वास नाही का? त्यांनी नाडी पाहिली. काही कळेना. ही क्षणिक निद्रा की चिरनिद्रा?
“काय हो, नीट नाही का लक्षण? बोलत का नाही तुम्ही?”
“मी डॉक्टरला बोलावतो.”
“मी केव्हापासून सांगते आहे की, डॉक्टरला बोलवा म्हणून. जा आधी. उठा.”
विश्वासराव निमूटपणे उठले. ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरने पाहिले. सारा खेळ खलास झाला होता.
“डॉक्टर, काय आहे?”
“संपले !”
“अरेरे ! असे कसे हो झाले !” रमाबाईंनी हंबरडा फोडला. डॉक्टर निघून गेले. रमाबाई बाळाला पोटाशी धरीत होत्या. जणू त्याला जिवंत करू पाहात होत्या. विश्वासरावांच्या डोळयांतही पाणी आले. असे कसे हे मरण? त्यांना त्या मरणाची अपूर्वता वाटत होती. त्या दु:खातही ते विचार करीत होते.
“रमा, रडू नको. बाळ पुण्यवंत होता. जणू तुटलेला पवित्र तारा. पुन्हा वर गेला. त्याच्या पुण्यवंत आत्म्याला येथली हवा जणू मानवेना. उगी, रडू नको. आपल्या घरात प्रेम नाही म्हणून का बाळ गेला? येथे सरला नाही म्हणून का बाळ गेला?”
“काढू नका त्या सरलेचे नाव. ती जेथे जेथे राहील तेथे तेथे स्मशान होणार !”
घरात उदास खिन्नता होती. विश्वासरावांनी बाळ नेले. भूमातेच्या कुशीत बाळ झोपला. विश्वासराव घरी आले. कोणी आज बोलत नव्हते. विश्वासराव सरलेच्या खोलीत बसले होते. रमाबाई बाळाची खेळणी, आंगडी-टोपडी पाहून अश्रू ढाळीत होत्या.
काही दिवस गेले. आणि रमाबाई आजारी पडल्या. विश्वासराव शुश्रूषा करीत होते. परंतु बरे होण्याचे चिन्ह दिसेना.
“बाळाकडे मी जात्ये.”
“आणि मी काय करू?”
“तुम्ही तुमच्या सरलेकडे जा. अलीकडे सारखे सरला सरला म्हणत असता. जा तिच्याकडे !”