नामपाठ - अभंग १६९१ ते १७१०
१६९१
संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगतां सकळ करीन काम ॥१॥
तेणें माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥
शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥३॥
एका जनार्दनीं हेंचि पैं मागत । नाहीं दुजा हेत सेवेविण ॥४॥
१६९२
संताचिये घरीं होईन श्वानयाती । उच्छिष्ट तें प्रीति मिळेल मज ॥१॥
तेणें या देहाची होईल शुद्धता । भ्रम मोह ममता निवारेल ॥२॥
आशा पाश सर्व जातील तुटोनी । जीव हा बंधनीं मुक्त होय ॥३॥
एका जनार्दनीं भाकीन करुणा । श्रीसंतचरणा वारंवार ॥४॥
१६९३
संताचिये परिवारी । लोळेन मी निर्धारी ॥१॥
जीवा होईल महालाभ । ऐसा घडतां उद्योग ॥२॥
सांडोनियां थोरपण । शिव घालीं लोटांगण ॥३॥
आपुलें महत्त्व । तेथें मिरवुं नये सत्य ॥४॥
शरण एका जनार्दनीं । वोवाळावा जीव चरणीं ॥५॥
१६९४
संतांचे चरणीं । सुख घेईन मी धणी ॥१॥
करीन नीचवृत्ति काम । मना होईल विश्राम ॥२॥
बंधनाची बेडी । तुटेल तयाचीये जोडी ॥३॥
एका जनार्दनीं शरण । वासना जाईन करपोन ॥४॥
१६९५
अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित ॥१॥
अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिकां जोडी ऐशीं नाहीं ॥२॥
सर्व पर्वकाळ आले तयां ठायां । विश्रांती घ्यावया इच्छिताती ॥३॥
एका जनार्दनीं सुखाचें माहेर । भवसिंधुपार तारक हें ॥४॥
१६९६
एकविध भाव संतांच्या चरणीं । घेईन पायवाणी धणीवरी ॥१॥
आनंदें चरण धरीन आवडी । हीच माझी जोडी सर्व जाणा ॥२॥
उतराई तयांच्या नोहे उपकारा । धाडिती माहेरा निजाचिया ॥३॥
एका जनार्दनीं घडतां त्यांचा संग । जन्ममरण पांग तुटे मग ॥४॥
१६९७
संत जाती हरिकीर्तनी । त्यांच्या वाहीन मोचे वहाणा ॥१॥
हेंचि भवसिंधुचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥
जन्मोजन्मींचे भेषज । तें हें संतचरणरज ॥३॥
संतचरणींच्या पादुका । जाहला जनार्दन एका ॥४॥
१६९८
एक आहे मज आस । संत दासाचा मी दास ॥१॥
कै पुराती मनोरथ । संत सनाथ करतील ॥२॥
मनींचें साच होईल कोई । क्षेम मी देई संतांची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । माझा मनीं नवस पुरे ॥४॥
१६९९
आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं ॥१॥
सर्वभावे त्याचें करितां सेवन । आमुचें हितकल्याण जन्मोजन्मीं ॥२॥
एका जनार्दनीं संतांचे चरणीं । जाईन लोटांगणीं जीवेभावें ॥३॥
१७००
संत भलते याती असो । परी विठ्ठल मनीं वसो ॥१॥
तया घालीन लोळणीं । घेईन मी पायवणी ॥२॥
ज्ञाती कुळासी संबंध । मज नाहीं भेदाभेद ॥३॥
भलते ज्ञातीचा । विठ्ठल उच्चारी वाचा ॥४॥
तेथें पावन देह चारी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥५॥
१७०१
पायारीं घालीन मिठी । दाटेन कंठीं सदगद ॥१॥
वाहेन टाळी नाचेन रंगीं । दुजें संगीं नका कांहीं ॥२॥
पायवणीं वंदीन माथा । निवारेल चिंता मग सर्व ॥३॥
एका जनार्दनीं दान । द्यावे दोष गुण न पाहा ॥४॥
१७०२
तुम्ही कृपा केलियावरी । पात्र होईन निर्धारी ॥१॥
आतां नका धरूं दुजें । मीतूंपणाचें उतरा ओझें ॥२॥
एका जनार्दनीं शरण । जीवींची निजखूण त्या द्यावी ॥३॥
१७०३
सोनियाचा दिवस आजी झाला । संतसमागम पावला ॥१॥
तेणें फिटलें अवघें कोडें । झालें परब्रह्मा उघडें ॥२॥
एका जनार्दनीं सेवा । करीन मी त्याची भावां ॥३॥
१७०४
माझ्या मना धरीं गोडी । संत जोडी करी तूं ॥१॥
मग सुखा काय उणें । देवचि ठाणें दुणावें ॥२॥
कळिकाळ वंदी माथां । नाहीं चिंता संसार ॥३॥
एका जनार्दनीं दास । हेंचि आस पुरवावी ॥४॥
१७०५
मनाची नखी न लगे जयां ठाया । तेणें उणी पायां भेटवी संत ॥१॥
संत उदार उदार । नामामृतें भरलें सागर ॥२॥
एका जनार्दनीं संत । कोण जाणेंत्यांचा अंत ॥३॥
१७०६
करी कांहीं मनाएका विचरणा । संतांच्या चरणा न विसंबे ॥१॥
तयाचा मी दास कामारी दुर्बळ । तेंचि माझे सकळ हित करती ॥२॥
देउनि प्रेमपान्हा लाडिवाळपणें । कृपेचें पोसणें तुमचे मी ॥३॥
जनार्दनीं एका तुमचा तो दास । तयासी उदस धरुं नये ॥४॥
१७०७
मनाचेनि मनें जहालों शरणागत । कृपावंत संत मायबाप ॥१॥
धरुनियां आस घातली लोळणीं । मस्तक चरणीं माझा तुमच्या ॥२॥
तुमचा मी दास कामारी त्रिवाचा । आणिक मनाचा संकल्प नाहीं ॥३॥
एका जनार्दनीं तुम्हीं तों पावन । काय हा मी दीन वानुं महिमा ॥४॥
१७०८
पाहुनियां मनोगत । पुरवा हेत तुम्ही माझा ॥१॥
मग मी न सोडी चरणां । संत सुजाणा तुमचीया ॥२॥
दंडवत घालीन पायां । करा छाया कृपेची ॥३॥
शरण एका जनार्दनीं । मुगुटमणीं तुम्हीं संत ॥४॥
१७०९
जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥
हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥
मागणें तें नाहीं आणिक तयासी । संत हे सेवेसी झिजवी अंग ॥३॥
एका जर्नादनीं सेवेसी मन । रात्रंदिवस ध्यान लागो त्याचें ॥४॥
१७१०
जगीं जनार्दन मुख्य हाचि भाव । संत तेचि देववृति ऐसी ॥१॥
समाधी साधन संतजन । विश्रांतीचें स्थान संतापायीं ॥२॥
योगयाग धारण पंचाग्र्नि साधन । तें हें ध्यान संतापायीं ॥३॥
एका जनार्दनीं तयांचा सांगात घडो मज निश्चित सर्वकाळ ॥४॥