रामनाममहिमा - अभंग ८६१ ते ८७०
८६१
निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणें वैकुंठीचें ॥१॥
ऐसें वेदशास्त्रें पुराणें सांगतीं । नामें जोडे मुक्ति नारीनरां ॥२॥
भलतिया भावे मुखीं नाम गावें । तयासै राणिवे वैकुंठीचें ॥३॥
एक जनार्दनीं प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिल डोळां धन्य झालों ॥४॥
८६२
सकाम निष्काम । वाचे गातां रामनाम ॥१॥
नाम उच्चारितां होटीं । जन्म जरा तुटे आटी ॥२॥
नामांचे महिमान । महा दोषी जाहले पावन ॥३॥
ब्रह्महत्य बाळहत्यारी । नामें तरलें निर्धारीं ॥४॥
एका जनार्दनीं नाम । उत्तमा उत्तम निजधाम ॥५॥
८६३
सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि ॥१॥
ऐसे महिमा वेद सांगें । नक आड मार्गें जाऊं कोण्ही ॥२॥
भावे करितं भगवद्भक्ती । मोक्षप्राप्ति तात्काळ ॥३॥
स्वानंदें भगवद्भजन । एका वंदी त्याचे चरण ॥४॥
८६४
जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों ॥१॥
तेणें घडे संतसेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥
आलिया जन्मांचे सार्थक । गांतां रामनाम देख ॥३॥
नामावांचुनी सुटिका । ब्रह्मादिकां नोहे देखा ॥४॥
नाम जपे शूलपाणी । एका जनार्दनीं ध्यानीं ॥५॥
८६५
राम हें माझें जीवींचें जीवन । पाहतां मन हें जालें उन्मन ॥१॥
साधन कांहीं नेणें मी अबला । शाम हें वीजु बैसलेंसे डोळा ॥२॥
लोपल्या चंद्रसुर्याच्या कळा । तो राम माझा जीवीचा जिव्हाळा ॥३॥
प्रकाश हा दाटला दाही दिशा । पुढें वो मार्ग न दिसे आकाशा ॥४॥
खुंटली गति श्वासा वो उश्वासा । तो राम माझा भेटेल वो कैसा ॥५॥
यासी हो साच परिसा हो कारण । शरण एका जनार्दन नेणें तेंचि साधन ॥६॥
८६६
जनार्दनें मज सांगितला मंत्र । रामनम पवित्र जप करीं ॥१॥
सोडवील राम संसार सांकडीं । न पडेचि बेडी अरिवर्गां ॥२॥
जप तप साधन पुराण श्रवण । नाम घेतां जाण सर्व घडती ॥३॥
एका जनार्दनीं टाकुनी संशयो । नाम मुखीं राहो प्रेमें पोटीं ॥४॥
८६७
नाम सुलभ इहलोकीं । तरले तरले महापातकी ।
म्हणोनि वाचे जो घोकी । नित्य नेमें आदरें ॥१॥
तयाचें तुटतें बंधन । होय जन्माचें खंडन ।
वाचे गातां जनार्दन । सोपें जाण साधन हें ॥२॥
नमन करुनी समाधान । आठवी रामनामाचें ध्यान ।
शरण एका जनार्दनीं । समाधान संतोष ॥३॥
८६८
ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥
एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥
८६९
वाणी वदे रामनाम । तेणें साधे सर्व काम ॥१॥
मनें रामाचें चिंतन । नामीं चित्त समाधान ॥२॥
बुद्धिलागीं हाचि छंद । नित्य वदावा गोविंद ॥३॥
गोविंदावांचुनी । दुजा ध्यास नाहीं मनीं ॥४॥
एका जनार्दनीं मन । नित्य करी ब्रह्माध्यान ॥५॥
८७०
उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥
तैसा विनटें रामनामा । तेणें चुकशी कर्माकर्मा ॥२॥
मुषक देखोनि मार्जार । तैसे उभे यम किंकर ॥३॥
मीन तळमळी जैसा । विषयीक प्राणी तैसा ॥४॥
शरण एका जनार्दनीं । दुजा छंद नाहीं मनीं ॥५॥