एकीबेकी - अभंग १९९ ते २०१
१९९
एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणतां हरी ॥धृ ॥
नव्हें काई बाई तेथें झालें एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आलें जाण ॥ एकी ॥१॥
एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥
एक ब्रह्मा पुर्ण तेथें फाट झाली माया । एका जनार्दनी नित्य लक्ष लावीं पायां ॥ एकी ॥ ३॥
२००
खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥
एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरितां शेवटीं होईल फुकी ॥२॥
एका दोन तीन चार पांच सहाच्या पडो नको डाई । सहास्त्र लक्ष कोट गेले उगाचि शीण पाहीं ॥३॥
एका जनार्दनीं म्हणे कान्होबा वाउगा नको गोऊं । जेणे करुनी संसार खेळ तुटोन लक्ष तुझें पायीं लाऊं ॥४॥
२०१
वायां खेळ एकीबेकी । पडलीस काळाचे मुखीं ॥१॥
आधींच एक निर्गुण रे । मायेनें केलें सगुण रे ॥२॥
एकीबेकी म्हणतां एकलें रे । दोन म्हणतां सर्व आतलें रे ॥३॥
एका जनार्दनीं ऐकलें रे । एक जण अवघें फिटलें रे ॥४॥