नामपाठ - अभंग १४११ ते १४३०
१४११
जेथें सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी ॥१॥
यमधर्म संगे दूता । तुम्ही सर्वथा जाऊं नका ॥२॥
जेथे स्वयें हरि उभा । कोण शोभा तुमची ॥३॥
तुम्ही रहावें उभे पुढें । आलें कोडें निवारावें ॥४॥
एका जनार्दनीं कीर्तन । श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥
१४१२
कीर्तनें सिद्धि कीर्तनें सिद्धि । कीर्तनें निरसे आधिव्याधी ॥१॥
कीर्तनें काया कीर्तनें माया । कीर्तनें सर्व एक ठाया ॥२॥
द्वंद्व द्वैत भेद नुरेची ठाव । कीर्तनीं तिष्ठें उभाचि देव ॥३॥
निद्रेमाजीं वोसणें देवो । म्हणें मज ठावो कीर्तनीं ॥४॥
एका जनार्दनीं कीर्तनासाठी । देव धावें भक्तापाठीं ॥५॥
१४१३
जुनाट कीर्तनमहिमा । तया काय देऊं उपमा ॥१॥
धन्य धन्य हरीचे दास । करिती आस कीर्तनीं ॥२॥
मागें तरले पुढें तरती । पहा प्रचीती पुराणीं ॥३॥
म्हणोनि एका काकुलतीं । कीर्तन करा दिनराती ॥४॥
१४१४
परपंरा कीर्तन चाली । मागुन आली अनिवार ॥१॥
उद्धवा सांगे जनार्दन । कीर्तन पावन कलीमाजीं ॥२॥
अर्जुना तोचि उपदेश । कीर्तन उद्देश सर्वथा ॥३॥
एका जनार्दनीं तत्पर । कीर्तन करावें निरंतर ॥४॥
१४१५
काळाचे तो न चले बळ । करितां कल्लोळ कीर्तनीं ॥१॥
शिव सांगे गिरजेप्रती । कीर्तनीं प्रीति धरावीं ॥२॥
सांगे शुक परिक्षिती । कीर्तनीं उद्धार पावती ॥३॥
एका अनन्य त्यांचा दास । धरतीं आस कीर्तनीं जे ॥४॥
१४१६
कीर्तनानंद चारी मुक्ती । धांवत येती घरासी ॥१॥
सोपें सार सोपें सार । कीर्तन उच्चार कलीयुगीं ॥२॥
वाहतां टाळीं कीर्तनछंदें । जाती वृंदे पातक ॥३॥
एका विनटला कीर्तनीं । भुक्तिमुक्ति लागतीं चरणीं ॥४॥
१४१७
कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां ॥१॥
कलीयुगीं हेंचि सार । करावें साचार कीर्तन ॥२॥
कृता त्रेता द्वापारीं । कीर्तनमहिमा परोपरी ॥३॥
एका तयांसी शरण । कीर्तन करितीं अनुदिन ॥४॥
१४१८
वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी ॥१॥
वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनीं नेटका भाव सोपा ॥२॥
श्रुतीचेनी मतें पाहे तो उच्चार । परी सारासारविचार कीर्तनीं ॥३॥
एका जनार्दनीं पुराणाच्या गोष्टी । कीर्तन वाक्पुटीं करा सुखें ॥४॥
१४१९
नेणें वेदशास्त्र पुराण पठण । तेणें नामकिर्तन करावें ॥१॥
कलीमाजीं सोपा मार्ग । तरावया जग उत्तम हें ॥२॥
नोहे यज्ञ यागयोग व्रत । करावें व्रत एकादशी ॥३॥
एका जनार्दनीं सार । वाचे उच्चार हरिनाम ॥४॥
१४२०
एक कीर्तन करितां पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणें ॥१॥
संतसमागम टाळ घोळ नाद । ऐकतां गोविंद सुख पावे ॥२॥
जनार्दनाचा एक करी विनवणी । मस्तक चरणीं ठेवितसे ॥३॥
१४२१
योगी शिणती साधनीं । पावन होती ते कीर्तनीं ॥१॥
अष्टांग धूम्रपान । तया श्रेष्ठ हें साधन ॥२॥
समाधी उन्मनी । कीर्तनीं पावन हे दोनी ॥३॥
चौदेहांसी अतीत । कीर्तनीं होतीं तें मुक्त ॥४॥
कर्म धर्म न लगे श्रम । व्यर्थ वाउगा विश्रांम ॥५॥
कीर्तन छंद निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥६॥
१४२२
ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी ॥१॥
होती तीर्थें तीं बापुडीं । मळ रोकडी टाकिती ॥२॥
ऐकोनी कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकीचा व्यापार ॥३॥
यमपाश टाकिती खालीं । देखोनि कीर्तनाची चालीं ॥४॥
ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं देखे डोळीं ॥५॥
१४२३
येती कीर्तना आल्हादें । गाती नाचती परमानंदे । सुखाची तीं दोंदें । आनंदें तयासी ॥१॥
धन्य धन्य कीर्तन । धन्य धन्य संतजन । जाले कीर्तनीं पावन । परमानंदगजरीं ॥२॥
हरि कृष्ण गोविंद । हाचि तया नित्य छंद । तेणें जाय भेदाभेद । कीर्तनगजरीं ॥३॥
एका जनार्दनीं सार । कीर्तनीं केलासे निर्धार । आणिक नाहीं दुजा विचार । कीर्तनावांचोनी ॥४॥
१४२४
कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥
पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनीं सरते कलियुगी ॥२॥
कीर्तन श्रवण मनन पठण । कीर्तनें पावन तिन्हीं लोक ॥३॥
एका जनार्दनीं कीर्तनीं आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥
१४२५
करितां भगवद्भक्ती । चारी मुक्ति पायां लागती ॥१॥
ऐसा लाभ नाहीं कोठें । कीर्तनामाजीं देव भेटे ॥२॥
योगयाग तप साधन । कासया तें ब्रह्माज्ञान ॥३॥
न लगे तीर्थाचें भ्रमण । सदा ध्यान नारायण ॥४॥
एका जनार्दनीं भक्ति । तेणें पावे उत्तम गती ॥५॥
१४२६
सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥
मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥
प्रेमें नाचे कथामेळीं । सुखकल्लोळीं हरिनाम ॥३॥
गर्जती नाम सदा वाचे । एका जनार्दनी तेथें नाचे ॥४॥
१४२७
कीर्तनीं आवडी जया नरा देखा । चुकतीस खेपा जन्माकोटी ॥१॥
कीर्तनीं समाधीं कीर्तनीं समाधी । पुढें आधीव्याधी कीर्तनेची ॥२॥
कीर्तनें बोध कीर्तनें सिद्धी । एका जनार्दनीं गोविंदीं कीर्तनीं ऐक्य ॥३॥
१४२८
पुरुष अथवा नारी । नाचती कीर्तन गजरीं ॥१॥
तया कोनी जें हासती । त्यांचें पूर्वज नरका जाती ॥२॥
आपुली आपण । कीर्तनीं सोडवण ॥३॥
देहीं असोनी विदेहता । कीर्तनीं होय पैं तत्त्वतां ॥४॥
ऐसा कीर्तनमहिमा । एका जनार्दनीं उपमा ॥५॥
१४२९
सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं ॥१॥
सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥
सर्वां देहीं सर्व वेदेहीं । सर्वां वदवीं कीर्तन ॥३॥
सर्व मनीं सर्व ध्यानीं । सर्वां ठिकाणीं कीर्तन ॥४॥
सर्व देशीं सर्व गांवीं । एका भावीं कीर्तन ॥५॥
१४३०
ऐशी शांती जयासी देखा । तोचि सर्व भुतांचा सखा ॥१॥
सर्व लोकीं आवडता । जाला सरता कीर्तनीं ॥२॥
सर्व लोकीं आवडता । जाला ठायीं देखें देवो ॥३॥
सर्व दृष्टीचा देखणा । शरण एका जनार्दना ॥४॥